ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बालेश धनखर नावाच्या एका उद्योजकाने माणुसकीला लाज वाटेल असं कृत्य केलं आहे. त्याने नोकरीचं प्रलोभन दाखवून ड्रग्ज देत पाच महिलांवर बलात्कार केले. इतकंच नाही तर या नराधमाने महिलांवर अत्याचार करताना त्याचे व्हिडीओही काढले. अखेर सिडनी न्यायालयाने सुनावणीनंतर त्याला दोषी घोषित केलं आहे. विशेष म्हणजे बालेश धनखरचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांबरोबर फोटोही समोर आले आहेत. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
बालेश धनखरचे राजकीय लागेबांधे, पंतप्रधान मोदींच्या भेटीचे फोटो
बलात्कारात दोषी सिद्ध झालेल्या बालेश धनखरचे बड्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे होते. त्याने ऑस्ट्रेलियात भारतातील सत्ताधारी भाजपाला पाठिंबा देणारा उद्योजकांचा एक समूह तयार केला होता. धनखर ऑस्ट्रेलियातील भाजपाला पाठिंबा देणाऱ्या या समुहाचं नेतृत्व करत होता. विशेष म्हणजे धनखरचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचे फोटोही समोर आले आहेत. मात्र, ही प्रकरणं समोर आल्यानंतर त्याने हे फोटो हटवण्यास सुरुवातकेली.
धनखरचे याच राजकीय ओळखीमुळे सिडनीतील अनेक मोठ्या नेत्यांशीही राजकीय संबंध होते.
सिडनी पोलिसांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये बालेश धनखरच्या घरावर छापे टाकल्यानंतर त्यांना महिलांवर बलात्कार केल्याचे १७ व्हिडीओ सापडले होते. यातील काही व्हिडीओत पीडित महिला बेशुद्ध अवस्थेत दिसल्या, तर काही व्हिडीओत महिला भयानक स्वप्न पाहत असल्याप्रमाणे ओरडताना दिसल्या. धनखरने त्याच्या कम्प्युटरमध्ये कोरियन महिलांच्या नावाप्रमाणे हे व्हिडीओ सेव्ह केल्याचं समोर आलं. याशिवाय त्याच्या ब्राऊझरमध्ये काही पॉर्न व्हिडीओंचे बुकमार्कही आढळले. धनखरने तसेच व्हिडीओ महिलांवर अत्याचार करताना काढले.
हेही वाचा : शाळकरी मुलीवर शिक्षकाकडून अत्याचाराचा कळस, ४ महिन्यांपासून सुरू होतं विकृत कृत्य
बालेश धनखरवर कोरियन चित्रपट, भाषा आणि महिलांचा प्रभाव असल्याचं समोर आलं. त्याने २०१७ मध्ये महिलांना नोकरी देणारी एक बनावट जाहिरात काढली होती. ही जाहिरात कोरियनमधून इंग्रजीत भाषांतर करणाऱ्या जागेसाठीची होती. धनखर जाहिरात वाचून नोकरीसाठी येणाऱ्या महिलांच्या मुलाखती घ्यायचा आणि त्यांच्याबाबतची टीपणं काढायचा. तसेच सिडनीत नव्याने राहायला आलेल्या आणि नोकरीची गरज असलेल्या महिलांना आपलं सावज बनवायचा.
३९ आरोपांमध्ये दोषी सिद्ध
न्यायालयाने बालेश धनखरला तब्बल ३९ आरोपांमध्ये दोषी घोषित केलं आहे. यात १३ बलात्कार, सहमतीशिवाय व्यक्तिगत व्हिडीओ शूट करण्याची १७ प्रकरणं , अमली पदार्थांचा उपयोग करण्याचे ६ प्रकरणांचा समावेश आहे.