उत्तर प्रदेशातल्या बलियामध्ये सोमवारी सकाळी एक मोठी नाव दुर्घटना घडली आहे. ही नाव दुर्घटना फेफना पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या माल्देपूर घाट परिसरात घडली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत चार जणांचा बळी गेला आहे. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, ही दुर्घटना झाली तेव्हा बोटीवर तब्बल ४० पेक्षा जास्त प्रवासी होते. बोट उलटल्यावर बोटीतले काही लोक बेपत्ता झाले आहेत. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहे.

बलियामध्ये सोमवारी फेफना पोलीस ठाण्याअंतर्गत गंगा नदीत एका बोटीचा अपघात झाला. माल्देपूर घाटातून गंगा नदीच्या पात्रातून जाणारी बोट नदीच्या मध्यभागी उलटली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर काही वेळातच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, या बोटीत तिच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. परिणामी ही बोट नदीच्या मध्यभागी उलटली. बोटीतले प्रवासी हे मुंडन समारंभात सहभागी झाले होते. बोट उलटल्यानंतर काही लोक पोहत बाहेर आले, तर घटनास्थळी उपस्थित लोकांनी लगेच नदीपात्रात उड्या मारून ज्यांना पोहता येत नव्हतं अशा काही लोकांना वाचवलं. लोकांनी ज्यांना नदीतून बाहेर काढलं त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> पापुआ न्यू गिनी आणि फिजीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा सन्मान, दोन्ही देशांनी सर्वोच्च पुरस्काराने केला गौरव

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तसेच बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, नदीत बुडणारे काही लोक पोहून बाहेर येतायत, तर काहीजण जीव वाचवण्यासाठी हातपाय मारतायत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर बोटीतले २० पेक्षा जास्त प्रवासी बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader