Jaffar Express Hijack Video: पाकिस्तानमधील अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी सुमारे ५०० प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करून त्यातील शेकडो प्रवाशांचे अपहरण केले होते. दरम्यान रेल्वेतील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न सुरू असून, काही प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे. अशात आता या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या बलुच लिबेरशन आर्मीने जाफर एक्सप्रेवरील हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये काय?
या व्हिडिओच्या पहिल्या दृश्यात फुटरतावाद्यांनी रेल्वे रुळांवर स्फोट घडवून आणत जाफर एक्सप्रेसला थांबण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. त्यानंतर बलुच लिबेरशन आर्मीच्या लोकांनी रेल्वेवर गोळीबार केला आणि व्हिडिओच्या शेवटी ते रेल्वेतील प्रवाशांना बाहेर काढून त्यांना ताब्यात घेत असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानातील क्वेट्टा आणि सिबी दरम्यान १०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा बोलान बोगदा आहे. या दरम्यान १७ रेल्वे स्थानके आहेत. येथे आव्हानात्मक भूभागामुळे गाड्या अनेकदा मंदावतात. याचाच फायदा घेत काल फुटीरतावाद्यांनी जाफर एक्सप्रेसवर हल्ला करत प्रवाशांचे अपहरण केले होते.
१५५ प्रवाशांची सुटका
दरम्यान, या हल्ल्यांच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी किमान २७ फुटीरतावद्यांना ठार केले असून, १५५ प्रवाशांची सुटका केली आहे. सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, बचाव मोहिमेदरम्यान ३७ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
बलुच लिबरेशन आर्मीच्या मागण्या
जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. यात बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या कोणत्याही सुरक्षा एजन्सीचा प्रभाव नसावा, या प्रांतात सुरक्षा एजन्सीचा प्रतिनिधी नसावा, ही प्रमुख मागणी आहे.
यासह चीन सरकारने बलुच प्रांतात सुरू केलेल्या सीपीईसी प्रकल्पावर बलुचिस्तानी लोक नाराज आहेत. या प्रकल्पाद्वारे बलुच प्रांतातील खनिजे लुटली जात असल्याचा येथील लोकांचा दावा आहे. तसेच या प्रकल्पामुळे बलुच प्रांतातील हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. काही वेळा सरकारने स्थानिकांच्या मागण्या धुडकावून त्यांचं विस्थापन केलं आहे. त्यामुळे बलुच लोक गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत. याच काळात काही फुटीरतावाद्यांनी शस्त्रे हाती घेतली. दुसऱ्या बाजूला, सरकारने बलुचिस्तानी लोकांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे संघर्ष वाढला आहे.
बलुचिस्तानी फुटीरतावाद्यांनी हल्ला करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सीपीईसी प्रकल्पाला विरोध म्हणून फुटीरतावाद्यांनी अनेक वेळा पाकिस्तानवर असे हल्ले केले आहेत. तसेच चिनी अभियंते आणि पाकिस्तानी राजदूतांनाही लक्ष्य केले आहे.