Baloch Rebels Attack video : पाकिस्तानात ट्रेनचे अपहरण करणाऱ्या बलुच बंडखोरांनी नुकतेच त्यांनी केलेल्या निमलष्करी दलाच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिकांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला बलुचिस्तानच्या नोशकी येथील एका महामार्गावर झाला आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये बसमध्ये स्फोट होताना आणि धुराचे लोट निघत असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर आढळलेल्या पुराव्यांनुसार हा आत्मघातकी हल्ला होता आणि एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यात धडकवले. या स्फोटानंतर काही दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्यांच्यापैकी दोघे ठार झाले. दोन सामान्य नागरिक आणि तीन जवान देखील ठार झाले, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.
पंतप्रधान शेहबाज शरिफ यांनी या हल्ल्यावर टीका केली असून हा भ्याड हल्ला होता असे ते म्हणाले आहेत. दरम्यान यापूर्वी मंगळवारी, बीएलएने एका प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते आणि सुमारे ३६ तास यामधील प्रवाशांना ओलीस ठेवले होते.
नेमकं काय झालं होतं?
पाकिस्तानातील अशांत बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान फुटीरतावाद्यांनी सुमारे ५०० प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला केला होता आणि ही ट्रेन त्यांनी हायजॅक केली होती. पाकिस्तानच्या दुर्गम डोंगराळ भागात बंडखोरांनी बोगद्यामध्ये रेल्वे ट्रॅक उडवून दिला आणि ही रेल्वे ताब्यात घेतली. पाकिस्तानातील क्वेट्टाकडून पेशावरकडे जाणाऱ्या या जाफर एक्स्प्रेसच्या ९ डब्यांमध्ये ४४० प्रवासी होते. क्वेट्टापासून १६० किमी अंतरावर डोंगराळ प्रदेशातून जात असताना गुदलार आणि पिरू कुनरी येथे बोगद्यात ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) स्फोट घडवून ती ताब्यात घेतली. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने चालवलेल्या मोहिमेत २१ प्रवासी व निमलष्करी दलाच्या चार जवानांचा मृत्यू झाला. तर सुरक्षा दलांनी सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना केला.