Baloch Rebels : पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातील बलुच लिबरेशन आर्मी (BLA) नावाच्या बंडखोर संघटनेने जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली आहे. यामध्ये ४०० प्रवासी आहेत ज्यांना ओलीस ठेवण्यात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काही लोकांना ठारही करण्यात आलं आहे. ही ट्रेन क्वेटाहून पेशावरला चालली होती.
ट्रेन कशा पद्धतीने हायजॅक करण्यात आली?
जाफर एक्स्प्रेस ही ट्रेन बोगद्यात होती. त्यावेळी बलुच बंडखोरांनी रेल्वेचा ट्रॅक बॉम्बने उडवला. तसंच आता त्यांनी ही धमकी दिली आहे की जर आमच्या विरोधात कुठलीही मोहीम सुरु करण्यात आली तर ओलीस ठेवलेल्या लोकांना ठार करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आपण जाणून घेऊ हे बलुच बंडखोर कोण आहेत आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं आहे?
बलुच बंडखोर कोण आहेत?
बलुच बंडखोर हा पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील सक्रिय बंडखोरांना सशस्त्र समूह आहे. बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा करावा आम्हाला स्वातंत्र्य दिलं जावं ही त्यांची मागणी आहे. बलुचिस्तानमधल्या बंडखोरांची ही संघटना २००० या वर्षापासून पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर यांच्या विरोधात सातत्याने संघर्ष करते आहे. बलुचिस्तानमध्ये तांब्याच्या आणि सोन्याच्या खाणी आहेत. मात्र आम्हाला पाकिस्तान सरकारने विकासापासून वंचित ठेवलं असून आमचं शोषण चालवलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
बलुच बंडाची सुरुवात कधी झाली?
बलुचिस्तानमध्ये बंडाची सुरुवात १९४७ मध्ये झालेल्या स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच झाली. बलुच नेत्यांनी पाकिस्तानात विलीन होण्यास नकार दिला होता. १९४८ मध्येही या प्रांतात मोठा हिंसाचार झाला होता. दरम्यान बलुचिस्तान हा पाकिस्तानातला असा प्रांत आहे ज्यात नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच या प्रांताचं क्षेत्रफळ जास्त आहे आणि लोकसंख्या कमी आहे. तरीही इथल्या जनतेला गरीबीशी सामना करावा लागतो आहे आणि आम्हाला ठरवून उपेक्षित ठेवलं जातं आहे असा आरोप इथल्या नागरिाकांनी केला आहे.
१९७० मध्ये काय घडलं होतं?
बलुचिस्तानात १९७० च्या दशकातही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. मात्र पाकिस्तानच्या लष्कराने हे बंड मोडून काढलं. त्यानंतर २००० या वर्षी पुन्हा एकदा बंड झालं. तेव्हापासून बलुचिस्तानात ही आग धुमसते आहे. आता पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातील BLA च्या लष्कराने हे म्हटलं आहे की आमच्या विरोधात सरकारने कुठलीही मोहीम सुरु केली तर आम्ही ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना ठार मारण्यास सुरुवात करु असं बलुच सैन्याने म्हटलं आहे.
BLA च्या मागण्या काय आहेत?
बलुचिस्तान मधल्या या लष्करी संघटनेने आम्हाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य द्या ही प्रमुख मागणी केली आहे. तसंच त्यांनी ही मागणीही केली आहे की बलुचिस्तानमध्ये ज्या सोन्याच्या खाणी आहेत त्यांचा उपयोग आमच्या प्रांताचा विकास करण्यासाठी केला जावा. तसंच आमच्या प्रांतात जी साधनसंपत्ती आहे त्याचा वापर आमच्या प्रांताच्या विकासासाठी करावा अशीही मागणी बलुचिस्तानने केली आहे.