Ban Chhava Movie: ‘छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत. नागपूरमधील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी’, अशी मागणी मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. छावा चित्रपटात मुघल शासक औरंगजेब यांचे ज्याप्रकारे चित्रण केले, त्यामुळे तरूणांची माथी भडकवली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. मौलाना रझवी यांनी काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर रमजानमध्ये रोजा न ठेवल्याबद्दल टीका केली होती. तसेच शमीच्या मुलीने होळी खेळल्याबद्दलही बोल लावले होते.
ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी पुढे म्हटले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छावा चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांवरही कायदेशीर कारवाई करावी.
“छावा चित्रपटात औरंगजेबाचे चित्रण ज्यापद्धतीने करण्यात आले, त्यावरून तरूणांची माथी भडकवली जात आहेत. ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूरमध्ये दंगल उसळण्यास सदर चित्रपट कारणीभूत आहे”, असा आरोप मौलाना रझवी यांनी केला.
मौलाना रझवी पीटीआयशी बोलताना पुढे म्हणाले, “छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशातील वातावरण बिघडत चालले आहे. छावा चित्रपटात मुघल शासक औरंगजेबाची प्रतिमा हिंदूविरोधी दाखवून हिंदू तरूणांना भडकवले जात आहे. त्यामुळेच हिंदू संघटनांचे नेते विविध ठिकाणी सम्राट औरंगजेबाबद्दल द्वेषपूर्ण भाषणे देत आहेत.”
औरंगजेबाला मुस्लीम आदर्श मानत नाहीत
मौलाना रझवी पुढे म्हणाले, भारतातील मुस्लीम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाहीत. आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो, त्यापेक्षा अधिक काही नाही. तसेच नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन केले होते. त्या परिसरातील उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही केला होता ‘छावा’चा उल्लेख
मंगळवारी (१८ मार्च) विधीमंडळात निवेदन करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छावा चित्रपटामुळे औरंगजेबाविरोधात रोष वाढत आहे, हा मुद्दा मान्य केला होता. “मला कुठल्या चित्रपटावर टीका करायची नाहीये. आज महाराष्ट्रात ‘छावा’ या चित्रपटाने संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावनाही मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा रागही मोठ्या प्रमाणावर बाहेर येतोय. पण हे सगळं जरी असले, तरी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.