सुटय़ा सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी होत असली तरी त्याची तातडीने अंमलबजावणी होण्याची शक्यता कमीच आहे. कारण या विषयावर घाईघाईत निर्णय घेतला जाऊ नये, असा केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना आग्रह आहे.
तंबाखू व सुपारी ही महत्त्वाची पिके असून त्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून मगच या संदर्भातील निर्णय घेतला जावा, असे मंत्रिगणांचे म्हणणे आहे. नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आयोजित केलेल्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांकडे हा आग्रह धरण्यात आला. या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या सल्ल्यानंतरच सुटय़ा सिगारेट विक्री बंदीबाबत निर्णय घेतला जावा, असे या बैठकीत ठरले.