केंद्र सरकार धर्मातरावर जोपर्यंत बंदी घालत नाही तोपर्यंत धर्मातराचे प्रकार सुरूच राहणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे.
येथून नजीकच असलेल्या पुत्तूर येथे ‘विराट हिंदू हृदय संगम’मध्ये तोगडिया यांचे भाषण झाले. धर्मातराबाबत यापुढे हिंदू गप्प बसणार नाहीत. कारण हिंदूंची संख्या घटत चालली आहे, असे तोगडिया म्हणाले. त्यामुळे सरकारने धर्मातरावर बंदी घालावी अथवा आम्हाला धर्मातराचा कार्यक्रम सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले.
‘घरवापसी’ कार्यक्रमावरून एनडीए सरकारला जोरदार विरोध होत आहे. धर्मातरबंदीचा कायदा आणण्याचे संकेत सरकारने दिले असून त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे. देशात समान नागरी कायदा आणावा आणि कोणत्याही धर्माच्या दाम्पत्याला केवळ दोनच मुले हवीत असा नियम करावा, असेही तोगडिया म्हणाले.
हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’ला विरोध करावा त्यामुळे देशाची ओळख नष्ट होत आहे. काश्मीरमधील चार लाख हिंदू कुटुंबांनी दबावाखाली धर्मातर केले आहे त्यांना पुन्हा त्यांच्या धर्मात आणले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Story img Loader