Banana Sold for 52 Crore in Auction : जगभरात वेगवेगळ्या कलाकृतींची पारख असणारे अनेक जण आहेत. श्रीमंत लोक आपलं घरं, कार्यालय इत्यादी सुशोभित करण्यासाठी महागड्या कलाकृती विकत घेतात. अशा वस्तुंची खरेदी-विक्री ही लिलावाच्या माध्यमातून होत असते. सध्या अशाच एका अनोख्या कलाकृतीच्या लिलावाची जोरदार चर्चा होतेय. सुप्रसिद्ध इटालीयन कलाकार मॉरिझियो कॅट्टेलान (Maurizio Cattelan) यांच्या ‘भिंतीवर डक टेपने लटकवलेले केळी’ या कलाकृतीचा नुकताच लिलाव झाला. इतकेच नाही तर अनेकांसाठी अगदी साधारण वाटणाऱ्या कलाकृतीला कोट्यवधींची किंमत मिळाली आहे.
सार्वजनिकरित्या आयोजित करण्यात आलेल्या सोथेबीज लिलावामध्ये (Sothebys Auction) भिंतीवर डकटेपने चिकटवलेली केळी या कलाकृतीला ६.३ दशलक्ष डॉलर म्हणजेच ५२.३५ कोटी रुपयांची बोली लागली. या वादग्रस्त कलाकृतीचे नाव ‘कॉमेडियन’ असे असून, या लिलावानंतर तिची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे.
कॉमेडियन ही कलाकृती पहिल्यांना २०१९ मध्ये जगासमोर आली, यानंतर काही कलाप्रेमींडून तिचे कौतुक केले गेले. तर काहींनी यावर टीकादेखील केली. दरम्यान कलाकार कॅट्टेलान हे त्यांच्या प्रक्षोभक कलाकृतींसाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी तयार केलेले ‘अमेरिका’ नावाची गोल्डन टॉयलेट ही कलाकृती देखील अशीच चर्चेत राहिली होती.
कॅट्टेलान यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘कॉमेडियन’या कलाकृतीचा सार ती बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्यात नसून तो त्या मागच्या कल्पनेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही कलाकृती विकत घेणारा व्यक्ती फक्त डक टेप आणि केळी एवढंच विकत घेत नाही तर त्याबरोबरच ही प्रमाणित कलाकृती (Certified Art) म्हणून पुन्हा तयार करण्याचे बौद्धिक अधिकार देखील विकत घेतो.
मॉरिझियो कॅट्टेलान (Maurizio Cattelan) यांनी यापूर्वी बोलताना सांगितलं होतं की, ‘कॉमेडियन’ हा फक्त एक विनोद नसून ते मूल्य आणि कला यासंबंधी समाजाच्या कल्पनांवर केलेलं एक प्रामाणिक भाष्य आहे.
हेही वाचा>> Crime News : धक्कादायक! तरुणीच्या चेहऱ्यावर फासली मानवी विष्ठा, तोंडात कोंबून…; क्रूर कृत्याने खळबळ
विकत घेतलेला व्यक्ती काय म्हणाला?
चिनी उद्योगजक जस्टिन सन ही कलाकृती विकत घेतल्यानंतर एक्स या मायक्रोब्लॉगिंग साइटवर पोस्ट करत माहिती दिली. तसेच आपण केळी विकत घेतल्याचा अभिमान असून आपल्याल प्रचंड आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जस्टिन सन म्हणाले की, “मी मॉरिझिओ कॅट्टेलान यांची प्रतिष्ठित कलाकृती, कॉमेडियन ६.२ दशलक्ष डॉलर्समध्ये यशस्वीरित्या विकत घेतली आहे, ही फक्त एक कलाकृती नाही; ही एक अशी सांस्कृतिक घटना आहे, जी कला, मीम्स आणि क्रिप्टोकरन्सी समुदाय यांच्या जगाला जोडते”.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं की, “मला विश्वास आहे की ही कलाकृती भविष्यात आणखी विचारांना आणि चर्चांना प्रोत्साहन देईल आणि इतिहासाचा एक भाग बनेल. या केळीचा मालक असणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे आणि जगभरातील कला रसिकांना आणखी प्रेरणा देण्यासाठी मी उत्सुक आहे”.
“याशिवाय, येत्या काही दिवसांत, कलेचा इतिहास आणि पॉप्युलर कल्चर या दोन्हींमध्ये या कलाकृतीचं जे स्थान आहे त्याच्या सन्मानार्थ एक अनोखा कलात्मक अनुभव म्हणून मी स्वत: केळी खाईन”, असेही सन त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.