बंगळुरूमधील एका शासकीय उर्दू प्राथमिक शाळेच्या तब्बल ३५०हून अधिक विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माध्यान्ह भोजनानंतर या विद्यार्थ्यांना डोकेदुखी, पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने डॉ.आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“जवळपास ३५० विद्यार्थ्यांची माध्यान्ह भोजन केल्यानंतर प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील बहुतेक जणांना उपचारानंतर घरी देखील पाठविण्यात आले आहे. सदर प्रकरणासंबंधी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.” असे आरोग्य मंत्री यू.टी.खादेर यांनी सांगितले.
तर, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असून चिंता करण्याचे काहीच कारण नाही. सर्वांना लवकरच घरी सोडण्यात येईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

Story img Loader