पीटीआय, बंगळुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठेवून शांतता कधीही मिळणार नाही. अधिकाधिक मजबूत होऊनच जागतिक संतुलनासाठी आपण काम करू शकू,’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले.

बंगळुरूमधील ‘एअरो इंडिया’ प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरील अस्थिरता पाहता भारतासारखा मोठा देश कायमच शांतता आणि स्थिरतेच्या बाजूने उभा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांही समान भागीदार होण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. राजनाथ सिंह म्हणाले, ‘अलिप्त राहून राष्ट्रीय सुरक्षा किंवा शांतता प्राप्त होणार नाही. सुरक्षा, स्थिरता आणि शांतता यांचा विचार सीमांपलीकडील आहे. प्रदर्शनामध्ये परदेशातील कंपन्यांचा सहभाग हेच दाखवतो, की आपल्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या उद्दिष्टाबरोबर तेदेखील आहेत. आजच्या अस्थिरतेच्या काळात सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.’

‘बदलत्या काळात नव्या संधींवर लक्ष द्यावे’

‘युद्धाचे स्वरुप अतिशय वेगाने बदलत आहे. नवनवे उपाय स्वीकारण्याची आणि सातत्याने प्रगती करण्याची गरज आहे. नव्या क्षेत्रांत संरक्षण उत्पादकांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे,’ अशी अपेक्षा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्यक्त केली. संरक्षण उत्पादक कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना त्यांनी भारतामधील संरक्षण क्षेत्रातील उद्याोगपूरक वातावरणाचा संरक्षण साहित्य तयार करणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सीईओं’ना केले.

दरम्यान, ‘भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य महत्त्वाचा भाग राहील,’ असे वक्तव्य नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासातील राजनैतिक अधिकारी जॉर्गन अँड्र्यू यांनी केले. ‘एअरो इंडिया’मध्ये अमेरिकेबरोबरील भागीदारीच्या दालनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असून ते आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या गुरुवारी भेटणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अँड्र्यू यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

देशाचे संरक्षण उत्पादन विक्रमी १.२५ लाख कोटींचे असून, संरक्षण क्षेत्रातील निर्यात २१ हजार कोटी रुपयांवर प्रथमच पोहोचली आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

प्रशिक्षणार्थी विमानाचे ‘यशस’ नामकरण

‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने सोमवारी प्रशिक्षणार्थी विमान ‘हिंदुस्तान जेट ट्रेनर – ३६’चे (एचजेटी-३६) नामकरण ‘यशस’ असे केले आहे. या सुधारित प्रशिक्षणार्थी विमानात अनेक बदल करण्यात आले आहेत. संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार यांनी नव्या नावाचे अनावरण केले.