पीटीआय, बंगळुरू

बंगळुरूमध्ये हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. विमानांचा रोरावता आवाज आणि लवचिकता यांनी येथील आकाश थरारून सोडले. हवाई दलाच्या या लक्षवेधक कसरतींनी सोमवारपासून १५व्या ‘एअरो इंडिया’ हवाई प्रदर्शनाला दिमाखदार सुरुवात झाली.

बंगळुरूमध्ये येलहांका हवाई तळावर पाच दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून याकडे पाहिले जाते. दर दोन वर्षांनी याचे आयोजन केले जाते. विविध देश आणि कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. या कंपन्यांनी आपापली उत्पादने प्रदर्शनात मांडली आहेत.

‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने तयार केलेल्या ‘तेजस’ या हलके लढाऊ विमानातून खुद्द हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी प्रथम उड्डाण केले. ‘तेजस फॉर्मेशन’चे नेतृत्व त्यांनी केले. त्यानंतर महिला लढाऊ वैमानिकांनी राफेल विमानातून उड्डाण केले. हवाई दलातील लढाऊ महिला वैमानिकांची संख्या वाढत आहे, हे यातून दिसले. त्यानंतर ‘सूर्य किरण एअरोबॅटिक टीम’ने (स्कॅट) चित्तथरारक कसरती केल्या. विविध प्रकारची प्रात्यक्षिके दाखविली. या कसरती पाहून उपस्थित अचंबित झाले. ‘हॉक एमके १३२’ विमानांच्या पथकाने नऊ विमानांनी परस्परांना अगदी जवळून ठेवून अवकाशात भरारी घेतली.

भारतीय नौदलाच्या विमानांनी आकाशात ‘वरुण फॉर्मेशन’ केले. त्याला उपस्थितांनी चांगली दाद दिली. जॅग्वार विमानांनी आकाशात बाणांचा आकार तयार केला. तर, तीन सुखोई लढाऊ विमानांनी त्रिशूळचा आकार तयार केला.

अमेरिका रशियाची पाचव्या पिढीची विमाने एकाच ठिकाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेचे ‘लॉकहिड मार्टिन’ कंपनीचे ‘एफ-३५’ आणि रशियाचे ‘सुखोई-५७’ ही दोन्ही विमाने ‘एअरो इंडिया’मध्ये सहभागी झाली आहेत.

जगातील पाचव्या पिढीची विमाने प्रथमच यानिमित्ताने एका व्यासपीठावर आली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी ही विमाने संरक्षण तज्ज्ञांना पाहायला मिळणार आहेत. सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.