Bangladesh Protest Update: सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेल्या हिंसक आंदोलनामुळे अखेर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी हेलिकॉप्टरमधून बांगलादेशातून काढता पाय घेतल्याचं समोर आलं आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांनीच शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा करतानाच बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचंही जाहीर केलं आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा लष्करशाही परतणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण एका दिवसात जगभरात चर्चेत आलेले वकेर-उझ-झमान नक्की आहेत कोण?
महिन्याभरापासून बांगलादेशमध्ये तरुण रस्त्यावर उतरले असून शेख हसीना सरकारचा निषेध करताना दिसत आहेत. शेख हसीना सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये १९७१ च्या युद्धातील वीर व नेतेमंडळींच्या नातेवाईकांना ३० टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण ३० टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केलं. मात्र, यादरम्यान, शेख हसीना सरकारकडून आंदोलकांवर झालेल्या कारवायांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
गेल्या महिन्याभरात झालेल्या या हिंसक आंदोलनादरम्यान तब्बल २०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात प्रामुख्याने तरुणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण त्यानंतरही आंदोलकांनी आज ढाक्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. यामुळे अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
लष्करप्रमुखांनीच राजीनामा द्यायला सांगितलं?
दरम्यान, परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून लष्कर प्रमुख वकेर-उझ-झमान यांनीच शेख हसीना यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचं आता बोललं जात आहे. राजीनाम्यानंतर लष्कराच्याच हेलिकॉप्टरमध्ये कडक सुरक्षाव्यवस्थेत शेख हसीना यांना सुखरूप देशाबाहेर पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.
कोण आहेत बांगलादेशचे लष्करप्रमुख?
दरम्यान, शेख हसीना यांना इतकी वर्षं सत्तेत राहूनही बांगलादेशमध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती हाताळता आली नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याचवेळी, जी समस्या हाताळण्यात खुद्द शेख हसीनादेखील अपयशी ठरल्या, ती गोष्ट खांद्यावर घेण्यास पुढे सरसावलेले लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांचं नाव आता चर्चेत आलं आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच वकेर-उझ-झमान यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रं हाती घेतली आहेत!
एक महिन्याचे लष्करप्रमुखपद…
वकेर-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केली खरी. पण आता पुढे काय? असा प्रश्न बांगलादेशी जनतेला पडलेला असतानाच त्यांनी त्यावरही उत्तर दिलं. “देशात कर्फ्यू किंवा आणीबाणी लागू करण्याची कोणतीही आवश्यका आत्ता दिसत नाही. या परिस्थितीवर लवकरच तोडगा काढला जाईल. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर देशात अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल. आंदोलकांना माझं आवाहन आहे की त्यांनी आपापल्या घरी परतावं”, असं वकेर-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांना सांगितलं.
माजी लष्करप्रमुखांचे जावई
वकेर-उझ-झमान यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वीच लष्करप्रमुखपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. तीन वर्षांसाठी त्यांच्याकडे देशाचं लष्करप्रमुखपद राहणार आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, वकेर-उझ-झमान यांचा जन्म १९६६ साली ढाकामध्ये झाला. त्यांचा विवाह सराहनाझ कमलिका झमान यांच्याशी झाला आहे. सहारनाझ म्हणजे १९९७ ते २००० या काळात बांगलादेशचे लष्करप्रमुख राहिलेले जनरल मोहम्मद मुस्तफिझुर रेहमान यांच्या कन्या.
वकेर-उझ-झमान यांनी डिफेन्स स्टडीजमधून पदवी शिक्षण घेतलं आहे. तसेच, लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स इन डिफेन्स ही पदवीही घेतली आहे. बांगलादेशच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारण्याआधी वकेर-उझ-झमान यांनी सहा महिने चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. या काळात बांगलादेशच्या लष्करी कारवाया, इंटेलिजन्स युनिट आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांती फौजांमधील बांगलादेशी सैन्याची भूमिका या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या.
आपल्या कारकिर्दीत वकेर-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वर्तुळात स्थान मिळवलं होतं. त्यांनी बराच काळ शेख हसीना यांच्यासोबत काम केलं आहे. तसेच, पंतप्रधान कार्यालयात आर्म्ड फोर्सेस डिव्हिजनचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. बांगलादेशच्या लष्कराचं आधुनिकीकरण करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.