राजधानी ढाक्यातील उपनगरात मंगळवारी राणा प्लाझा ही आठ मजली व्यापारी संकुलाची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनशेपार गेली आहे. या इमारतीखालील ढिगाऱ्याखालून आतापर्यंत २,३४८ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून मृतांची संख्या ३०४ इतकी झाली आहे. दोन दिवस उलटून गेल्यानंतरही येथील मदतकार्य वेगाने सुरू असून अजूनही शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जास्तीत जास्त लोकांची सुटका करणे हेच आमचे पहिले लक्ष्य आहे, असे लष्कराच्या प्रवक्त्याने या इमारतीजवळ अधिकृत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. अजूनही हजारो लोक या इमारतीच्या कोसळलेल्या अवशेषांखाली असावेत, असा आमचा कयास आहे, असेही हा प्रवक्ता म्हणाला.इंटर सव्‍‌र्हिस पब्लिक रिलेशन्सचे संचालक शाहीनूल इस्लाम यांनी आतापर्यंत या दुर्घटनेत ३०४ मरण पावल्याचे सांगितले. हजारो टन सिमेंट काँक्रीटच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत २,३४८ जणांना बाहेर काढण्यात आल्याचेही ते म्हणाले.घटनास्थळी अडकलेल्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी आपल्या जवळच्यांच्या काळजीपोटी टाहो फोडला असून परिणामी मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. अनेक अडकलेल्यांशी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला आहे. त्यामुळे अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता लागू न शकल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा