Muhammad Yunus : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध ताणले गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे नुकतेच चीनच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे त्यांचा हा दौरा म्हणजे बांगलादेशकडून भारताला अप्रत्यक्ष संदेश असल्याचं बोललं जात होतं. यातच आता मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशला ‘गार्डियन ऑफ द सी’ असं संबोधलं आहे. तसेच मोहम्मद युनूस यांनी चीनला बांगलादेशात अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याचं आमंत्रणही दिलं आहे.
दरम्यान, मोहम्मद युनूस यांचा या संदर्भातील एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मोहम्मद युनूस यांनी चीन सरकारला देशात आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विनंती केली आहे. तसेच ढाका हा महासागराचा एकमेव संरक्षक असल्याचंही युनूस यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे
मोहम्मद युनूस नेमकं काय म्हणाले?
“भारतातील सात ईशान्य राज्ये अजूनही भूपरिवेष्टित आहेत. त्यांच्याकडे महासागरापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. या संपूर्ण प्रदेशासाठी बांगलादेश महासागराचे एकमेव रक्षक आहे. त्यामुळे हा चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळे काही वस्तू तयार करा, उत्पादन करा आणि वस्तू बाजारात आणा, जगभरातील देशासांठी निर्यात करता येऊ शकतात”, असं मोहम्मद युनूस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मोहम्मद युनूस यांनी आपण चीन आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांच्या नव्या टप्प्याची वाट पाहत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच मोहम्मद युनूस यांनी चीनच्या दौऱ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. या भेटीत युनसू यांनी बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनला गुंतवणूक वाढवण्याचं आवाहन केलं असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच युनूस यांनी चीनला बांगलादेशातील नद्या आणि पूर व्यवस्थापनासाठी ५० वर्षांचा मास्टर प्लॅन देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांच्या या भूमिकेमुळे भविष्यात भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारताची प्रतिक्रिया काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी एक्सवर मोहम्मद युनूस यांचा हा व्हिडिओ शेअर केला केला असून पोस्टमध्ये म्हटलं की, “भारतातील ७ राज्ये भूपरिवेष्टित आहेत, या आधारावर युनूस यांनी चीनला जे आवाहन केलं ते मनोरंजक आहे. बांगलादेशमध्ये गुंतवणूक करण्यास चीनचं स्वागत, पण ७ भारतीय राज्ये भू-वेष्टित असण्याचं नेमकं महत्व काय आहे?”, असं त्यांनी म्हटलं आहे.
चीनची बांगलादेशशी जवळीक भारतासाठी डोकेदुखी?
चीनचे आधीपासूनच बांगलादेशसोबत व्यापारी संबंध असून हे अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुहम्मद युनूस यांनी पदभार स्वीकारल्यापासून चीनमधील किमान १४ कंपन्यांनी २३० मिलियन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक बांगलादेशमध्ये केली आहे. बांगलादेशमध्ये चीनची वाढती गुंतवणूक भारतासाठी काळजीचा विषय ठरण्याची शक्यता आहे. शेजारी देशाच्या पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चीनचा वावर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.