India Bangladesh International Relations: गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून भारतानं वारंवार आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतरदेखील भारत व बांग्लादेश द्विपक्षीय संबंध ताणले गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस हे चीननं पाठवलेल्या जेट विमानातून बिजिंग दौऱ्यावर गेले आहे. हा बांगलादेशकडून भारताला अप्रत्यक्ष संदेशच असल्याचं बांगलादेशमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशला शुभेच्छा दिल्या. यामध्ये गेल्या काही महिन्यांत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर सूचक संदेशही दिल्याचं मानलं जात आहे.

“हा दिवस आपल्या संयुक्त इतिहास व त्यागाचं प्रतीक आहे. आपले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत व्हावेत यासाठी आपण बांधील राहिलो आहोत. त्यासाठी शांतता, स्थैर्य व समृद्धीच्या मार्गाने आपण प्रयत्न केले आहेत. दोन्ही देशांचे हितसंबंध राखण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी संवेदनशीलता दाखवणं यासाठी महत्त्वाचं आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुहम्मद युनूस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

युनूस यांचा बिजिंग दौरा आणि भारताला संदेश..

दरम्यान, बांगलादेश स्वातंत्र्यदिनी बांगलादेशमध्ये न थांबता युनूस थेट बिजिंग दौऱ्यासाठी गेले आहेत. याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असताना हा भारतासाठी संदेश असल्याचं म्हटलं जात आहे. “मुहम्मद युनूस यांनी त्यांच्या पहिल्या विदेशी दौऱ्यासाठी चीनची निवड केली आणि यातून बांगलादेश एक प्रकारचा संदेश देत आहे”, अशी प्रतिक्रिया बांगलादेशच्या परराष्ट्र विभागातील उच्चपदस्थ अधिकारी मोहम्मद जाशिम उद्दीन यांनी एएफपीला दिली आहे.

चीनची बांगलादेशशी जवळीक भारतासाठी डोकेदुखी?

चीनचे आधीपासूनच बांगलादेशसोबत व्यापारी संबंध असून हे अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुहम्मद युनूस यांनी पदभार स्वीकारल्यापासून चीनमधील किमान १४ कंपन्यांनी २३० मिलियन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक बांगलादेशमध्ये केली आहे. बांगलादेशमध्ये चीनची वाढती गुंतवणूक भारतासाठी काळजीचा विषय ठरण्याची शक्यता आहे. शेजारी देशाच्या पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चीनचा वावर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.