Taslima Nasreen : बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी (सोमवार) बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडला आहे. त्यांना भारताने आश्रय दिल्याच्या चर्चाही होत आहेत अशात लेखिका तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) यांनी शेख हसीना यांच्यावर टीका केली आहे. ज्यांना खुश करण्यासाठी मला देश सोडायला लावलात त्यांनी आज तुम्हाला देश सोडायला भाग पाडलं असं तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) यांनी म्हटलं आहे.
बांगलादेशची सद्यस्थिती काय?
बांगलादेशमध्ये चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांचं कार्यालयही जाळलं आहे. हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशच्या लष्करांने प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर सध्या बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांगलादेशमधील इंटरनेट सेवा देखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा- Sheikh Hasina : शेख हसीना भारतात अजित डोवाल यांना भेटल्या, पुढची रणनीती ठरली?
तस्लिमा नसरीन यांची पोस्ट काय?
“शेख हसीना यांनी इस्लाममधल्या फुटीरतावाद्यांना खुश करण्यासाठी १९९९ मध्ये मला देशातून बाहेर हाकललं, मी मृत्यूशय्येवर असलेल्या माझ्या आईला पाहण्यासाठी बांगलादेशात आले होते. मात्र मला हाकलण्यात आलं. त्यानंतर मला देशाने प्रवेश दिला नाही. ज्या फुटीरतावाद्यांना खुश करण्यासाठी शेख हसीना यांनी मला देशाबाहेर काढलं आज त्याच इस्लामी फुटीरतावाद्यांनी शेख हसीना यांना देश सोडण्यासाठी भाग पाडलं.
शेख हसीनाच या परिस्थितीला जबाबदार
शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. बांगलादेशात जी परिस्थिती जे अराजक निर्माण झालं आणि ज्या गोष्टीमुळे शेख हसीना यांना देश सोडावा लागला त्यासाठी त्या स्वतःच जबाबदार आहेत. शेख हसीना यांनी फुटीरतावादी लोकांना खुश ठेवलं, भ्रष्टाचारात सहभाग घेतला. त्यामुळे बांगलादेशात अराजक माजलं. बांगलादेश म्हणजे दुसरा पाकिस्तान होऊ नये म्हणून तिथे लष्कराचं शासन लागू केलं पाहिजे. असंही तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत तस्लिमा नसरीन?
तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका आहेत. ‘लज्जा’, ‘फेरा’, ‘बेशरम’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. त्यांनी मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे झाडल्याने त्यांना बांगलादेशातून बहिष्कृत करण्यात आलं. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्यामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला. मात्र भारताविषयी त्यांच्या मनात आदर आणि प्रेम आहे. भारताने त्यांना आश्रयही दिला आहे. आता त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागल्याने त्याच प्रसंगाची आठवण करुन देत टीका केली आहे.