बांगलादेशमध्ये ईदनिमित्त नमाज पठणाचा कार्यक्रम सुरू असताना झालेल्या बॉम्बस्फोटात गुरुवारी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले. किशोरगंज भागामध्ये हा स्फोट झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदनिमित्त नमाज पठणासाठी घटनास्थळी सुमारे ३ लाख नागरिक जमले होते. ज्या मैदानावर नमाज पठण केले जाते. त्याच्या प्रवेशद्वारावरच हा स्फोट घडवून आणला. एका घरामध्ये दडून बसलेल्या अज्ञातांनी त्यांच्याकडील स्फोटके फेकून हा स्फोट घडवून आणला आहे. या घटनेनंतर लगेचच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या घरामध्ये हल्लेखोर लपून बसले होते. तिथे पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक उडाली. एका हल्लेखोराचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बांगलादेशचे माहिती व प्रसारण मंत्री हसनुल हक यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यासाठीच त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. हा राजकीय हल्ला असून, याचा धर्माशी काहीही संबंध नाही.
काहीच दिवसांपूर्वी ढाक्यातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या भागातील एका कॅफेमध्ये घुसून दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एका भारतीय मुलीचाही समावेश होता. त्यानंतर लगेचच पुन्हा किशोरगंज भागामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला.