Sheikh Hasina : बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी उसळलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतलेला आहे. बांगलादेशमधील राजकीय उलथापालथीनंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान, आता शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात रविवारी एकापाठोपाठ आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, २०१५ मध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या प्रमुख खालिदा झिया यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आणि २०१३ मध्ये ढाका येथे एका रॅलीवरील गोळीबार प्रकरणामध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा सहभाग असल्याचा आरोप करत बीएनपी नेते बेलाल हुसैन यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता शेख हसीना यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढली असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच प्रकरण
बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या आरक्षणविरोधी आंदोलनाच्यावेळी दोन वेगवेगळ्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये शेख हसीना यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढाका येथे झालेल्या हिंसाचारात दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी शेख हसीना यांच्यासह अन्य १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तानुसार, १९ जुलै रोजी शेकडो विद्यार्थी निदर्शने करत होते. त्यामध्ये मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. मात्र, विद्यार्थी निदर्शन करत असताना पोलीस आणि अवामी लीग समर्थकांनी दोन्ही विद्यार्थ्यांना गोळ्या घातल्या. या प्रकरणात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
खालिदा झिया यांच्यावरील हल्ला प्रकरण
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) नेते बलाल हुसैन यांनी शेख हसीना यांच्यावर २०१५ मध्ये बीएनपी प्रमुख खालिदा झिया यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शेख हसीना आणि अन्य ११३ जणांचा सहभाग असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
बांग्लादेश पीपल्स पार्टी (बीपीपी) चे अध्यक्ष बाबुल सरदार चाखारी यांच्यावतीने ढाका मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. यामध्ये २०१३ मध्ये एका रॅलीवर अंदाधुंद गोळीबार करून लोकांची हत्या केल्याप्रकरणी शेख हसीना यांच्यासह ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आता त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या १० पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये बांगलादेशातील मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह विविध कलमांचा समावेश असलेले गुन्हे दाखल झाले आहेत, असं एका वृत्तात हिंदुस्तान टाइम्सने म्हटलं आहे.