बांगलादेशाच्या शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने सर्वसाधारण निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे. रविवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानंतर याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, निवडणुकीच्या काळात राजकीय हिंसेत देशभरात १७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षांनी मतदानात गडबड केल्याचा आरोप करत पुन्हा एकदा मतदानाची मागणी केली आहे.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३०० पैकी २६६ जागांवर एकतर्फी विजय नोंदवला आहे. बांगलादेशातील डीबीसी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ३०० पैकी २९९ जागांचे निकाल हाती आले आहेत. अवामी लीगने २६६ जागांवर विजय मिळवला आहे. तर त्यांच्या सहकारी पक्षाने २१ जागा मिळवल्या आहेत. तर विरोधी आघाडी नॅशनल यूनिटी फ्रंटला अवघ्या ७ जागांवरच विजय मिळाला आहे.
AFP News Agency: Bangladesh Prime Minister Sheikh Hasina's party wins election, local TV reports pic.twitter.com/b77S8qB2ht
— ANI (@ANI) December 30, 2018
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय नोंदवला आहे. तर एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तिथे निवडणूक झाली नव्हती. हसीना यांना दक्षिण पश्चिम गोपालगंज मतदारसंघात २,२९,५३९ मते मिळाली. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी बीएनपीच्या उमेदवाराला अवघे १२३ मते मिळाली, अशी माहिती बांगलादेश निवडणूक आयोगाने दिली.
बांगलादेशमधील विरोधी पक्ष एनयूएफ आघाडीने निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. काळजीवाहू तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. एनयूएफ ही अनेक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये बीएनपी, गोनो फॉरम, जातीलय समाजतांत्रिक दल, नागोरिक ओयक्या आणि कृषक श्रमिक जनता लीगचा समावेश आहे. दरम्यान, शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले आहे. अवामी लीग पक्षाचे भारताशी नेहमी सौहार्दाचे संबंध आहेत.