नवी दिल्ली : बांगलादेश हा चीनचा संभाव्य आर्थिक विस्तार असू शकतो असे सांगतानाच या भागातील समुद्राचा आपला देश एकमेव रखवालदार आहे, अशी दर्पोक्ती बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार महम्मद युनूस यांनी अलिकडेच केली. भारताच्या इशान्येकडे असलेली सात राज्ये ही ‘जमीनबंद’ (लँडलॉक) असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

इशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य भूमीशी जोडणारा ‘चिकन नेक’ नावाने ओळखला जाणारा पश्चिम बंगालमधील एक चिंचोळा जमिनीचा पट्टा आहे. शेख हसिना यांचे सरकार उलथून पडण्यापूर्वी बांगलादेशमार्गे या राज्यांमधून जलदगतीने

दळणवळण करण्याची चाचपणी केंद्र सरकारकडून केली जात होती. मात्र अर्थशास्त्राचे नोबेलविजेते असलेल्या युनूस यांच्या हाती सूत्रे आल्यानंतर नवी दिल्ली आणि ढाका संबंध ताणले गेले आहेत. आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात युनूस यांनी केलेल्या या विधानाची चित्रफीत तेथील सरकारने समाजमाध्यमावर प्रसृत केली आहे. यावर अद्याप भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीत युनूस यांनी आपल्या देशात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण चीनला दिल्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडल्याचे मानले जात आहे.

आम्ही चीनकडे एक चांगला मित्र म्हणून पाहणे आवश्यक आहे. दोन्ही देशांचे संबंध गेल्या काही वर्षांत अधिकाधिक चांगला झाले आहेत. ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी चीनची गुंतवणूक आवश्यक आहे.- महम्मद युनूस, बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार