बांगलादेशातील गुलशन भागातील हल्ल्यात २२ जण ठार झाल्याच्या घटनेतील दहशतवाद्यांनी भारतीय धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या शिकवणीपासून प्रेरणा घेतल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयए व गुप्तचर खाते (आयबी) तसेच इतरांनी त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नऊ पथके नेमली आहेत.

त्याच्या भाषणांच्या चित्रिफितींचा अभ्यास करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. गृहमंत्रालयातील विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या भाषणांच्या सीडी बघण्यासाठी चार पथके नेमली आहेत व समाजमाध्यमांवर तो टाकीत असलेला मजकूर तपासण्यासाठी तीन पथके नेमण्यात आली आहेत. नाईक याच्या फेसबुक पोस्ट तपासण्यासाठी खास पथके नेमण्यात आली आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार नाईक याची भाषणे प्रक्षोभक व आक्षेपार्ह होती हे दिसून आले आहे, तो लेखनही करीत आहे काय, याचा शोध घेतला जात असून त्यांच्या स्वयंसेवी संस्थेचा कारभारही संशयास्पद आहे. त्याच्या संस्थेला धर्मादाय म्हणून मिळालेली मदत नेमकी कशासाठी वापरली जाते याची तपासणी परदेशी देणगी नियंत्रण करण्यासंदर्भातील एफसीआरए कायद्याच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालय करीत आहे. त्याच्या परदेश दौऱ्यांचे पुरस्कर्ते व त्याच्या सभा याबाबत फोन कॉल्स व ईमेल्सची माहिती घेतली जात आहे. नाईक याच्यावर लवकरच बंदी घातली जाणार असून केंद्र सरकारने त्याबाबत कायदेशीर मत मागवले आहे. नाईक याने स्वत:ला कायदेशीरदृष्टय़ा सुरक्षित ठेवले असून त्याला सौदी राजेशाहीचा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने असे म्हटले आहे, की नाईक याच्या पीस टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. हे चॅनल भारतात दाखवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे आदेश देण्यात आले आहेत.

पीस टीव्हीवर बांगलादेश सरकारची बंदी

ढाका : भारतातील मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या पीस टीव्ही या वादग्रस्त वाहिनीवर बांगलादेश सरकारने बंदी घातली आहे. या वाहिनीवरून नाईक याची प्रक्षोभक भाषणे प्रसारित केली जात होती. नाईक याच्या फेसबुक पोस्टवरून प्रेरणा घेतलेल्या काहींचा बांगलादेशातील गुलशन भागात करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता असे सांगण्यात आले आहे. मुंबई येथील झाकीर नाईक यांच्या पीस टीव्ही बांगला वाहिनीवर बंदी घालण्याचा निर्णय कायदा व सुव्यवस्था खात्याच्या मंत्रिमंडळ समितीने घेतला असल्याची माहिती उद्योगमंत्री आमीर होसेन अमू यांनी दिली. या बैठकीस वरिष्ठ मंत्री, सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी काही प्रक्षोभक भाषणे दिली जातात किंवा नाही यावरही लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.