Bangladesh Home Ministry Orders: महिन्याभरापूर्वी बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊन शेख हसीना यांना पायउतार व्हावं लागलं होतं. त्यापाठोपाठ नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्याकडे हंगामी सरकारचं प्रमुखपद आलं. त्यानंतर गेल्या काही दिवसांत बांगलादेशमधील अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बांग्लादेश सरकारच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नमाज व अजानच्या पाच मिनिटे आधी दुर्गा पूजेसाठी वापरण्यात येणारे लाऊड स्पीकर बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे.

बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचे हे निर्देश १० सप्टेंबर अर्थात मंगळवारी दिले. यानुसार, दुर्गा पूजा उत्सवादरम्यान वापरण्यात येणारे लाऊडस्पीकर व गाण्यांसाठीची इतर साधने अजान किंवा नमाज सुरू होण्याच्या पाच मिनिटे आधी बंद करण्यात यावीत, असे निर्देश बांग्लादेशच्या गृह मंत्रालयाकडू जारी करण्यात आले आहेत. मंगळवारी जहांगीर आलम चौधरी यांनी बांग्लादेश पूजा उद्यापन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतलं. या बैठकीमध्ये या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे येत्या ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये बांगलादेशमध्ये दुर्गा पूजा महोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सीमा भागात दुर्गा पूजा मंडप उभारण्याचं आवाहन

“माझी सगळ्यांना विनंती आहे की यंदा भारत-बांग्लादेश सीमाभागात चांगल्या प्रकारे दुर्गा पूजेसाठी मंडप आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून बांगलादेशमधील लोकांना पूजेसाठी पश्चिम बंगालच्या हद्दीत जावं लागणार नाही आणि तिकडच्या लोकांनाही इकडे यावं लागणार नाही”, असंही जहांगीर आलम चौधरी यांनी नमूद केलं.

पूजा मंडपांसाठी २४ तास सुरक्षा व्यवस्था

दरम्यान, बांग्लादेश पूजा उद्यापन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये दुर्गा पूजा मंडपांसाठी उत्सवाच्या काळात २४ तास सुरक्षा कशी पुरवता येईल, याबाबत चर्चा झाली असून त्यासंदर्भात योग्य ती पावलं उचलली जातील, असंही चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप

या वर्षी बांगलादेशमध्ये तब्बल ३२ हजार ६६६ दुर्गापूजा मंडप उभारले जाणार आहेत. यामध्ये ढाका दक्षिण शहर व ढाका उत्तर शहर या भागात अनुक्रमे १५७ आणि ८८ दुर्गापूजा मंडप उभारले जाणार आहेत. गेल्या वर्षी देशभरात ३३ हजार ४३१ पूजा मंडप उभारण्यात आले होते. या सर्व पूजा मंडपांना कोणत्याही अडथळ्याविना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जातील. समाजकंटकांकडून या उत्सवात बाधा आणली जाणार नाही, यासाठीही योग्य ती पावलं उचलली जातील, असं ते म्हणाले.

Story img Loader