पीटीआय, ढाका
बांगलादेशात जुलै-ऑगस्ट २०२४मधील घडामोडींविषयी ‘जुलै उठाव जाहीरनामा’ तयार करणार असल्याची घोषणा तेथील हंगामी सरकारने नुकतीच केली. या विद्यार्थी निदर्शनांचे नेतृत्व यकरणाऱ्या ‘अँटी-डिस्क्रिमिनेशन स्टुडंट्स मूव्हमेंट’ या संघटनेने आधी याच नावाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यापासून हंगामी सरकारने त्यापासून अंतर राखले होते. या उठावानंतरच तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी राजीनामा देऊन देश सोडला.
‘‘काही दिवसांतच सर्वांचा सहभाग आणि सहमतीने जाहीरनामा तयार केला जाईल आणि देशासमोर मांडला जाईल अशी आम्हाला आशा आहे,’’ असे हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांचे माध्यम सचिव शफिकुल आलम यांनी सोमवारी मध्यरात्री पत्रकार परिषदेत जाहीर केले. युनूस यांचे अधिकृत निवासस्थान जमुनाच्या समोर पत्रकारांशी बोलताना आलम यांनी माहिती दिली की, हा जाहीरनामा सर्व सहभागी विद्यार्थी, राजकीय पक्ष आणि ‘अँटी-डिस्क्रिमिनेशन स्टुडंट्स मूव्हमेंट’सह इतर सहभागी यांच्या मतांवर आधारित असेल.
सरकार, विद्यार्थी संघटनांमध्ये मतभेद
‘अँटी-डिस्क्रिमिनेशन स्टुडंट्स मूव्हमेंट’ने ‘नॅशनल सिटीझन्स कमिटी’ या आणखी एका विद्यार्थी संघटनेसह जुलै उठावाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची सोमवारी घोषणा केली होती. ढाक्याच्या ‘सेंट्रल शहीद मिनार’ येथे मंगळवारी दुपारी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार होता. मात्र, त्यानंतर या विद्यार्थी संघटनांनी घाईघाईने सोमवारी मध्यरात्रीनंतर बैठक बोलावली आणि जाहीरनामा प्रसिद्ध करण्याऐवजी केवळ ऐक्य मोर्चा काढण्याची घोषणा केली.
जनतेचे ऐक्य, फॅसिस्टविरोधी भावना आणि सुधारणा करण्याची सरकारची इच्छा या सर्व बाबी दृढ करण्याच्या हेतूने जाहीरनामा तयार करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.
शफिकुल आलम, मुहम्मद युनूस यांचे माध्यम सचिव
विद्यार्थ्यांची भारतविरोधी भावना?
जुलैच्या उठावादरम्यान जिथे एका मुद्द्याचा जाहीरनामा तयार करण्यात आला होता तिथेच बांगलादेशची १९७२ची मुजिबवादी (मुजिब उर रहमान यांच्या प्रेरणेने तयार झालेली) राज्यघटना गाडली जाईल असे विद्यार्थी नेता हसनत अब्दुल्ला यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. १९७२च्या राज्यघटनेच्या तत्त्वांच्या माध्यमातून भारताचा आक्रमकपणा सुरू झाला असा आरोप त्यांनी केला.
डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
ढाका : बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी मंगळवारी भारताच्या उच्चायुक्तालयामध्ये जाऊन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. उच्चायुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रा. युनूस यांनी डॉ. सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला, तसेच शोकसंदेश वहीमध्ये आपला संदेश लिहिला. भारताचे उच्चायुक्त प्रणय कुमार वर्मा यांनी युनूस यांचे स्वागत केले. यावेळी युनूस यांनी त्यांच्याबरोबर बोलताना आपले दीर्घकालीन मित्र मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘‘ते खूप साधे होते, खूप सूज्ञ होते, भारताचे रुपांतर आर्थिक महासत्तेत करण्यात सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली,’’ असे ते म्हणाले. सिंग यांचे २६ डिसेंबरला नवी दिल्लीत निधन झाले.
© The Indian Express (P) Ltd