ढाका : बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी सोमवारी देशातील हिंदू समुदायाची भेट घेतली आणि त्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. बांगलादेशमध्ये आंतरधर्मीय सौहार्दाला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात पलायन केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात हिंदू समाजाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यांचे व्यवसाय आणि मालमत्तेची मोडतोड करण्यात आली, तसेच हिंदू मंदिरांची नासधूस करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर युनूस यांनी हिंदू धर्मीयांची भेट घेतली.
हेही वाचा >>> Actor Darshan In Jail : तुरुंगात अभिनेता दर्शनला विशेष वागणूक; मुख्य अधीक्षकांसह ९ तुरुंग अधिकारी निलंबित
आपल्या देशातील जनतेमध्ये कोणतेही विभाजन असू शकत नाही. आम्ही समान नागरिक आहोत. हंगामी सरकार देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे मुख्य सल्लागार कार्यालयाने युनूस यांच्या हवाल्याने सांगितले. युनूस यांनी हिंदू समुदायाची भेट घेतल्यानंतर त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगितले. या बैठकीला बांगलादेश पूजाउजपन परिषदेचे अध्यक्ष बासुदेब धर, ढाक्याच्या रामकृष्ण मिशनचे आचार्य स्वामी पूर्णातमानंद महाराज, हिंदू समाजाचे नेते काजोल देबनाथ, मोनिंद्र कुमार नाथ आदी उपस्थित होते. ‘‘आम्ही युनूस यांच्याशी जवळपास एक तास चर्चा केली. आपण सर्व बांगलादेशी एकाच कुटुंबातील सदस्य असून सांप्रदायिकतेची भावना आपण दूर करू, असे आश्वासन त्यांनी दिले,’’ असे धर यांनी सांगितले.