Bangladesh Jeshoreshwari Temple: बांगलादेशमधील सातखीरा जिल्ह्यातील जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा मुकुट चोरीला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये या मंदिराला भेट दिली होती. तेव्हा हा मुकुट पंतप्रधान मोदी यांनी भेट दिला होता. मात्र, देवी कालीचा हा मुकुट मंदिरातून आता चोरीला गेला आहे. हा मुकुट चांदी आणि सोन्याने मढवलेला होता. या मंदिरातील पुजारी गुरुवारी सकाळी देवी कालीची पूजा संपल्यानंतर बाहेर निघून गेले. त्यानंतर दुपारी हा मुकुट चोरीला गेला. मात्र, काही वेळानंतर ही बाब तेथील सफाई कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेबाबत तेथील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तैजुल इस्लाम यांनी या घटनेची पुष्टी करत मंदिरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सांगितली. पोलिसांनी म्हटलं की, “आम्ही चोरांची ओळख पटवण्यासाठी मंदिरामधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. हा मुकुट चांदी आणि सोन्याने मढवलेला होता. तसेच या मुकुटाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.” दरम्यान, बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या हवाल्याने इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा : Balochistan Attack : पाकिस्तानात रक्तरंजित रात्र! बलूचिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून २० खाणकाम मजुरांची हत्या

जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा मुकुट चोरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मंदिराची देखभाल करणाऱ्या कुटुंबातील सदस्य ज्योती चट्टोपाध्याय यांनी बांगलादेशी मीडियाला सांगितलं की, “हा मुकुट चांदी आणि सोन्याचा होता. हा मुकुट भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये, जेशोरेश्वरी मंदिर भारत आणि शेजारील देशांमध्ये पसरलेल्या ५१ शक्तीपीठांपैकी एक म्हणून पूज्य आहे”, असं त्यांनी म्हटलं.

जेशोरेश्वरी देवी कालीचे प्रसिद्ध मंदीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेशोरेश्वरी देवी कालीच्या मंदिराला २०२१ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर असताना भेट दिली होती. तसेच याचवेळी सोन्या-चांदीने मढवलेला हा मुकुट जेशोरेश्वरी देवीला अर्पण केला होता. तसेच त्या भेटीचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. दरम्यान, जेशोरेश्वरी काली मंदिर हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. जे सातखीरा जिल्ह्यातील श्याम नगरममध्ये आहे.