ढाका : बांगलादेशच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात तपास सुरू केला असल्याचे वृत्त तेथील माध्यमांनी दिले. शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये पाच अब्ज डॉलरचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोसटॉम या रशियन सरकारी कंपनीकडून रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प उभारला जात असून त्यामध्ये काही भारतीय कंपन्यांचीही भागीदारी आहे. हा बांगलादेशचा पहिलाच अणुऊर्जा प्रकल्प आहे. रोसटॉम कंपनीने भ्रष्टाचाराचे आरोप प्रक्षोभक असल्याचे म्हणत ते फेटाळले आहेत. आपल्या सर्व नोंदी खुल्या आहेत आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक आहे असे कंपनीने प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेख हसीना, त्यांचा मुलगा साजीब वाझेद जॉय, अन्य एक नातेवाईक तुलिप सिद्दिक यांची नावे या भ्रष्टाचार प्रकरणात असून त्यांची चौकशी केल्याचे वृत्त ‘बीडीन्यूज’ने नुकतेच दिले.

शेख हसीना, जॉय आणि तुलिप यांनी रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पातून पाच अब्ज डॉलर मलेशियन बँकेत हस्तांतरित केल्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी आयोग (एसीसी) निष्क्रिय का आहे, पैशांचे हस्तांतरण बेकायदा का जाहीर केले जाऊ नये असे प्रश्न बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात विचारले होते. त्यानंतर या चौकशीला सुरुवात झाली असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> अमित शहांना लक्ष्य करण्याची रणनीती; बेळगाव कार्यकारिणीत आंबेडकरच मुद्दा

‘एसीसी’च्या दस्तऐवजांनुसार, नॅशनल डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे (एनडीएम) अध्यक्ष बॉबी हज्जाज यांनी रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पातील भ्रष्टाचाराचे आरोप उघड केले होते. सध्या शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना भारतात राहत आहे. हसीना यांचा मुलगा जॉय अमेरिकेत आहे तर तुलिप या ब्रिटिश संसदेच्या सदस्य आहेत.

मानवाधिकारांच्या संरक्षणाची ग्वाही

सॅन फ्रान्सिस्को : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी सोमवारी हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी दोघांनीही बांगलादेशात मानवाधिकारांचे संरक्षण करण्याप्रति कटिबद्धता व्यक्त केली अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली. डेमोक्रॅटिक पक्षाचे भारतीय वंशाचे काँग्रेस सदस्य श्री ठाणेदार यांनी अलिकडेच हिंदूंच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी ही चर्चा झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh launches 5 billion graft probe against sheikh hasina in nuclear power plant case zws