ढाका : बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर पलायन केले. यामुळे बांगलादेशातील त्यांची १५ वर्षांची राजवट अचानक संपुष्टात आली असून लष्करप्रमुखांनी लवकरच हंगामी सरकारची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.
बांगलादेशात गेल्या महिन्यापासून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थी आंदोलन सुरू होते. शनिवारी आंदोलन अधिक तीव्र होऊन त्याला हिंसक वळण लागले. रविवारी झालेल्या सत्ताधारी आवामी लिगचे कार्यकर्ते आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ पोलिसांसह १००पेक्षा जास्त लोक मारले गेले. काही माध्यमांनी मृतांचा आकडा ३००हून अधिक असल्याचा दावा केला आहे. या दंगलींनंतर सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लावली होती. सोमवारी हसीना यांच्या विरोधकांनी आंदोलकांच्या साथीने ढाक्यामध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि हसीना यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या लष्कराच्या विमानाने देशाबाहेर पळाल्या.
हेही वाचा >>> Stock Market Crash: अमेरिकेतील मंदीच्या भीतीने भांडवली बाजारांची गाळण
दरम्यान, बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांनी स्थानिक वेळेनुसार दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षाबरोबर हंगामी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. बांगलादेशच्या रस्त्यांवरील पोलीस मागे घेण्यात आले असून लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलकांनी बांगलादेशच्या रस्त्यांवर जल्लोष सुरू केला आहे. बांगलादेशातील घडामोडींकडे भारताचे बारकाईने लक्ष असल्याचे केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितले. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
हसीनांना लंडनमध्ये आश्रय?
शेख हसीना राजीनामा दिल्यानंतर काहीच वेळात देश सोडला. त्या नक्की कुठे गेल्या आहेत याबद्दल सुरुवातीला अनिश्चितता होती. मात्र, त्या लंडनला निघाल्या असल्याची माहिती वेगवेगळ्या राजनैतिक सूत्रांनी दिल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. त्या बांगलादेश हवाई दलाच्या वाहतूक विमानाने प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रवासादरम्यान त्या काही वेळासाठी भारतातही थांबल्याचे समजते. बांगलादेश हवाई दलाचे विमान त्यांना भारताबाहेरही घेऊन जाईल की त्यांच्यासाठी वेगळ्या विमानाची सोय केली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांगलादेशच्या विनंतीवरून भारताने आपल्या हवाई हद्दीतून जाण्यासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.