Bangladesh Political History: बांगलादेशमध्ये गेल्या महिन्याभरापासून चालू असणारा रस्त्यांवरचा हिंसाचार व शासकीय वर्तुळातील राजकीय घडामोडी नव्या वळणावर येऊन ठेपल्या आहेत. शेख हसीनांचा राजीनामा आणि अंतरिम सरकारची लष्करप्रमुखांची घोषणा यात आता आंदोलकांची नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी पंतप्रदानपद स्वीकारावं अशी इच्छा यामुळे राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे. शेजारी देश आणि आत्तापर्यंतच्या राजकीय मैत्रीचे संबंध यामुळे भारतासाठी या घडामोडी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. वास्तविक बांगलादेशचा स्थापनेपासूनचा राजकीय इतिहासच मुळात अस्थिरतेचा राहिला आहे.
स्थापनेपूर्वीचा ‘बांगलादेश’!
१९७१ साली बांगलादेशची औपचारिक स्थापना झाली. पण त्यापूर्वीच पूर्व पाकिस्ताननं पश्चिम पाकिस्तानशी (आत्ताचा पाकिस्तान) वाद मांडला होता. पश्चिम पाकिस्तानच्या अरेरावीला कंटाळलेल्या पूर्व पाकिस्तानमधील नागरिकांनी स्वतंत्र देशाचा झगडा सुरू केला होता. या दोहोंच्या मध्ये भारतीय भूमी असल्यामुळे भारतासाठीही ही डोकेदुखी ठरली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी वादात मध्यस्थी केली. पण पाकिस्तानच्या आक्रमक भूमिकेला अखेर भारतीय लष्कराला आक्रमकतेनंच उत्तर द्यावं लागलं आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली.
शेख मुजीबुर रेहमान यांचीच हत्या!
खरंतर बांगलादेशच्या निर्मितीमध्ये शेख मुजीबुर रेहमान यांचा मोठा वाटा होता. पण स्थापनेनंतर अवघ्या चार वर्षांत म्हणजेच १९७५ मध्ये शेख मुजीबुर रेहमान यांचीच त्यांच्या कुटुंबासह हत्या करण्यात आली. मुश्ताक अहमद यांनी त्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घेतली, पण त्यांचा पराभव करून लष्करप्रमुख जनरल झियाउर रेहमान हे बांगलादेशचे प्रमुख झाले. बांगलादेशात अघोषित लष्करशाही सुरू झाली. त्यावेळी ऐन उमेदीत असणाऱ्या शेख हसीना यांना आश्रयासाठी भारतात पलायन करावं लागलं. शेख हसीना पुढची जवळपास ४ वर्षं भारतातच राहिल्या. १९७९ साली त्या पुन्हा बांगलादेशात परतल्या.
जनरल झियाउर रेहमान यांची हत्या
पुढे १९८१ ते ८३ हा काळ बांगलादेशमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरता घेऊन आला. सर्वसत्ताधीश जनरल झियाउर रेहमान यांची सरकारमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हत्या करण्यात आली. हा काळ बांगलादेशमधील सरकारसाठी रक्तरंजित असाच ठरला. देशाचे उपाध्यक्ष अब्दुस सत्तार यांची तत्कालीन लष्करप्रमुख जनरल हुसेन मुहम्मद इर्शाद यांनी हत्या घडवून आणली. पुढे इर्शाद यांनी स्वत:ला बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करून घेतलं.
पुन्हा लोकशाहीचं क्षितिज…
१५ वर्षं लष्करशाहीत काढल्यानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा लोकशाहीसाठी प्रयत्न होऊ लागले. लष्करशाहीविरोधात देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले. या आंदोलनासमोर मान झुकवत हुसेन मुहम्मद इर्शाद यांनी राजीनामा दिला. त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगवासाची शिक्षा झाली. नव्याने निवडणुका होईपर्यंत शाहबुद्दीन अहमद यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार केला.
पहिल्या मुक्त निवडणुका, पहिल्या महिला पंतप्रधान!
देशात लोकांनीच हाती घेतलेल्या परिस्थितीतून अखेर पहिल्या मुक्त वातावरणातल्या निवडणुका १९९१ साली पार पडल्या. सध्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्या खलिदा झिया देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. १९९६ साली झालेल्या निवडणुकीत शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.
शेख हसीना पायउतार, पुन्हा झियांकडे नेतृत्व
बांगलादेशी जनतेनं आलटून-पालटून सत्ता देण्याचा क्रम कायम राखला. २००१ साली झालेल्या निवडणुकांमध्ये शेख हसीना यांचा पराभव झाला. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी पुन्हा सत्तेत आली. खलिदा झिया यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एका महिला पंतप्रधानाने तिसऱ्यांदा आपला कार्यकाळ पूर्ण केला.
पुन्हा लष्कराचा राजकारणात प्रवेश…
जवळपास १५ वर्षं लोकशाही पद्धतीने सरकार चालल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा लष्कर वरचढ झालं. २००७ साली काळजीवाहू सरकारच्या अध्यक्षपदावरून वाद झाल्यामुळे राजकीय अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली. देशात आणीबाणी लागू झाली. लष्कराच्या पाठिंब्यावर अर्थतज्ज्ञ फखरुद्दीन अहमद यांनी सरकारचा कार्यभार आपल्या हाती घेतला. भ्रष्टाचारविरोधी कारवाईच्या नावाखाली दोन माजी पंतप्रधान, अर्थात शेख हसीना व खलिदा झिया यांना तुरुंगात डांबण्यात आलं.
बांगलादेशात शेख हसीना युगाची सुरुवात…
२००८ साली बांगलादेशात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. पुन्हा एकदा लष्करशाही बळावत असल्याचं वाटत असतानाच निवडणुकांमधून सत्तापालट झाला आणि शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. २००८ सालीच त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर लागलीच त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतला. त्यामुळे पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्ती तुरुंगात जाणं आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा पंतप्रधानपद स्वीकारणं या दोन्ही बाबी बांगलादेशच्या जनतेसाठी आता नवीन राहिलेल्या नाहीत.
१५ वर्षांहून जास्त काळ काही अपवाद वगळता बांगलादेशमध्ये लोकशाही व्यवस्था नियमितपणे चालवली जात होती. निवडणुकाही होत होत्या. पण या निवडणुकांमध्ये व सरकारी कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व हेकेखोरपणा बळावल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते व संघटनांकडून वारंवार केली जात होती. त्याविरोधात सातत्याने आवाजही उठवला जात होता. या आंदोलनांमुळे बांगलादेशमधील सामाजिक वातावरण ढवळून निघत होतं. शेख हसीना सरकारबद्दलचा लोकांमधला असंतोष वाढत होता. या संतापाचा उद्रेक अखेर गेल्या महिन्याभरात बांगलादेशच्या रस्त्यांवर दिसून आला. त्यामुळे शेख हसीना यांना मुदतीपूर्वीच राजीनामा देऊन थेट देशच सोडावा लागला. आता त्या पुन्हा बांगलादेशच्या राजकारणात सक्रीय होणार नाहीत, असं खुद्द त्यांच्या मुलानंच नमूद केलं असल्याने बांगलादेशमधून शेख हसीना युगाचा शेवट झाल्याचं आता मानलं जात आहे.