Bangladesh unrest threat of India: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची सत्ता उलथवून लावल्यानंतर बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण झाली. ज्यामुळे भारताला अतिरेकी संघटनाचा धोका निर्माण झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यामध्ये हिंदू अल्पसंख्यांकांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे. यामध्ये अतिरेकी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा संघटनेने ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अतिरेकी कारवाया करण्यासाठी बांगलादेशमधील अन्सारुल्ला बांगला टीम (ABT) या संघटनेशी हातमिळवणी केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. बांगलादेशमध्ये सत्तांतर घडविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर यंत्रणेने महत्त्वाचे योगदान दिल्याचेही समोर येत आहे. एबीटीसह जमात-ए-इस्लामी आणि इतर संघटनांशी आयएसआयचा थेट संपर्क होता, असेही या वृत्तात म्हटले गेले आहे.

हे वाचा >> Bangladesh Crisis : “आम्ही अपयशी ठरलो”, बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफी, शेख हसीनांच्या पक्षाला इशारा देत म्हणाले…

भारतात अतिरेकी कारवाया करण्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि एबीटी या संघटनांनी २०२२ एकत्र येत बांगलादेशमध्ये आपला तळ स्थापन केला होता. २०२२ साली त्रिपुरामध्ये एका मशि‍दीची तोडफोड झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर तेथील हिंदू-बहुल भागांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच वर्षी त्रिपुरामध्ये एबीटी संघटनेचे ५० ते १०० अतिरेकी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, अशीही माहिती समोर आलेली आहे. तसेच आसामध्येही अतिरेकी कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या एबीटीच्या काही लोकांना अटक करण्यात आली होती.

बांगलादेशमधील सक्रिय संघटना

सध्या बांगलादेशमध्ये नऊ मोठ्या अतिरेकी संघटना कार्यरत आहेत. १. अन्सारुल्ला बांगला टीम, २. अन्सार अल-इस्लाम, ३) लष्कर-ए-तोयबा ४) हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी बांगलादेश ५) जागराता मुस्लिम जनता बांगलादेश ६) जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश ७) पुरबा बांगलार कम्युनिस्ट पार्टी ८) इस्लामी छात्र शिबिर आणि ९) इस्लामिक स्टेट या संघटना सध्या बांगलादेशमध्ये सक्रिय आहेत.

हे ही वाचा >> Bangladesh Crisis: VIDEO: “लक्षपूर्वक ऐका, आरडाओरडा करून काहीही…”, भारतात प्रवेश करू इच्छिणाऱ्या बांगलादेशींना जवानाने समजावलं

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध होते. त्यामुळेच त्यांच्या राजवटीत या संघटनांवर अंकुश ठेवण्याचे काम झाले. मात्र सरकारी नोकऱ्यांमधील ३० टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून जो हिंसाचार उफाळला त्यामागे अतिरेकी संघटनांचा हात असण्याचीही शक्यता वर्तविली गेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh unrest gives rise to threat of terror organisations to india kvg