Bangladesh Protest News: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बांगलादेशमध्ये अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काल (दि. ५ ऑगस्ट) पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानातील सर्व वस्तू पळविल्या. आता इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेशच्या खुलना प्रांतामधील मेहेरपूर येथे असलेल्या इस्कॉन मंदिरात जाळपोळ करण्यात आली आहे. या जाळपोळीमुळे काही मुर्त्यांचे नुकसान झाल्याचे मंदिराचे प्रवक्ते युधिष्ठीर गोविंद दास यांनी सांगितले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, मागच्या २४ तासांत बांगालादेशमध्ये राजकीय अस्थिरता पसरली आहे. त्यांतरकाही मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठीर गोविंद दास यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, मेहेरपूरमधील आमच्या इस्कॉन मंदिरात जाळपोळ करण्यात आली आहे. मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी अशा तीन मूर्त्या जाळण्यात आल्या आहेत. या मंदिरात तीन भक्त राहत होते, ते कसेबसे मंदिरातून पळून जाण्यात यशस्वी ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे वाचा >> बांगलादेशमधील अस्थिरता, शेख हसीना यांनी देश सोडणं यामुळे भारताच्या चिंतेत वाढ; काय आहेत कारणं?
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जाण्याची भीती वर्तविली जात आहे. तसेच हिंदू मंदिरांना हानी पोहोचवली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. युधिष्ठिर गोविंद दास यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, चितगावमधील तीन मंदिरांना धोका होता. मात्र हिंदू नागरिक आणि त्यांच्याबरोबर काही स्थानिक मुस्लीम नागरिकांनी मिळून या मंदिरांचे संरक्षण केले.
युधिष्ठिर दास यांनी बांगलादेश पोलीस आणि रॅपिड ॲक्शन बटालियनकडे मदत मागितली. पण त्यांना काही उत्तर मिळाले नाही. सुरक्षा दलाच्या जवानांनी साध्या कपड्यात पळ काढल्याचा दावा त्यांनी केला. “सध्या अनेक हिंदूंच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यांना इथे असुरक्षित वाटत असून ते त्रिपुरा किंवा पश्चिम बंगालमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत”, असेही दास म्हणाले. बांगलादेशमधील परिस्थिती सुधारण्यासाठी लष्कर त्यांच्यापरिने प्रयत्न करत आहे. पण राजकीय पक्षांनीही परिस्थिती सामान्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा >> कोण आहे नाहिद इस्लाम? शेख हसीना यांच्याविरोधात विद्यार्थी आंदोलनाचे केले नेतृत्व
बांगलादेशमधील मंदिरे धोक्यात?
बांगलादेशमधील हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी कॉन्सिलचे नेते काजोल देबनाथ पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, सोमवारी आंदोलन भडकल्यानंतर बांगलादेशमधील हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले, पण त्यात फार नुकसान झाले नाही.