मूलतत्त्ववादी इस्लामी गट आणि पोलीस यांच्यात धर्मनिंदेविरोधात कठोर कायदा करण्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ३७ जण ठार झाले असून समाजकंटकांनी मंगळवारी येथे एका रेल्वेगाडीलाच आग लावली. त्यामध्ये गाडीचे दोन डबे जळून खाक झाले. बांगला देशात अद्यापही हिंसाचाराचा उद्रेक सुरूच असून हा घातपाताचा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुवर्ण एक्स्प्रेसच्या पाच डब्यांना समाजकंटकांनी आग लावली. त्यामध्ये दोन डबे जळून खाक झाले, सुदैवाने गाडीत कोणीही प्रवासी नसल्याने जीवित हानी झाली नाही, असे रेल्वेचे अधिकारी मियाँ जहान यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हिफाजतच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात येत असून त्याच्या निषेधार्थ बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी या प्रमुख विरोधी पक्षाने उद्यापासून दोन दिवसांच्या सार्वत्रिक बंदची हाक दिली असून जमात-ए-इस्लामी ही मूलतत्त्ववादी संघटना या विरोधी प्रक्षाची प्रमुख सहकारी आहे.
रेल्वे गाडीला आग लावण्याच्या प्रकारामध्ये हिफाजत किंवा विरोधी पक्षांचा हात आहे का, याचा तपास सुरू असल्याचे चितगाँवमधील कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी महिउद्दीन सेलीम यांनी सांगितले. हिफाजत आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत एकूण २८ जण ठार झाले. हाथझरी येथे झालेल्या चकमकीत लष्करातील एका सैनिकासह सात जण ठार झाले.
हिफाजतच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कडक अशा धर्मनिंदाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य १३ मागण्या केल्या आहेत आणि त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात येत आहे.

जुनैद नागरी या कडव्या नेत्यास कोठडी
इस्लामी मूलतत्त्ववादी नेता जुनैद बाबू नागरी याला हिंसाचारप्रकरणी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये अत्यंत कडक धर्मनिंदाविरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आमचे नेते आणि कार्यकर्त्यांची १२ मेपर्यंत सुटका करण्यात आली नाही तर अधिक उग्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा हिफाजतचे सांस्कृतिक सचिव अश्रफ अली निजामपुरी यांनी दिला आहे.

Story img Loader