Bangladesh Actor Shanto Khan Mob Lynched: आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेला हिंसाचार शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही संपलेला नाही. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलकांनी धुडगूस घातला. आवामी लीगच्या कार्यालयांमध्ये तोडफोड, जाळपोळ केली. तसेच, नेत्यांची घरंही जाळली. मात्र, या हिंसाचारामध्ये बांगलादेशमधील चित्रपट निर्माते सलीम खान आणि त्यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता शांतो खान यांची जमावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा शेख हसीना सरकारने घेतलेला निर्णय न पटल्यामुळे बांगलादेशमधील तरुण रस्त्यावर उतरले. आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सुरक्षा यंत्रणांनी आंदोलकांवर बळाचा वापर केला. त्यातून उद्भवलेली परिस्थिती विकोपाला गेली आणि परिणामी शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यानंतरही बांगलादेशमधील हिंसाचार अद्याप थांबलेला नसून आंदोलक ठिकठिकाणी जाळपोळ करताना दिसत आहेत.
नेमकं घडलं काय?
बांगलादेशच्या चांदपूर भागामध्ये अभिनेता शांतो खान व त्याचे वडील चित्रपट निर्माते सलीम खान असताना तिथे आंदोलन करणारा जमाव अचानक आक्रमक झाला. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलक ठिकठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी हिंसाचार सुरू झाल्यानंतर शांतो व सलीम खान यांनी घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला. पण जमावानं त्यांना गाठलं आणि त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
“मी काही तास आधीच त्यांच्याशी बोललो होतो”
दरम्यान, टॉलिवुडमधील प्रसिद्ध निर्माते अरिंदम दास यांनी घटना घडली त्या दिवशी सकाळीच सलीम खान यांच्याशी फोनवर बोलणं झाल्याचं नमूद केलं आहे. “मी सकाळीच सलीम खान यांच्याशी बोललो होतो. पण काही तासांत ‘कमांडो’ चित्रपटाचे दिग्दर्शक शमीम अहमद रॉनी यांचा मला अमेरिकेतून फोन आला. त्यांनी मला घडलेला प्रकार सांगितला आणि मला धक्का बसला”, असं दास यांनी सांगितलं आहे.
शेख हसीना यांच्या राजीनाम्याचं वृत्त जाहीर झाल्यानंतर शांतो खान व सलीम खान यांनी त्यांच्या गावातून निघून थेट फरक्काबाद बाजार गाठला. तिथून ते बाहेर पडत असताना स्थानिक आंदोलकांनी त्यांना अडवलं. हवेत काही गोळ्या झाडून त्यांनी तिथून स्वत:ची सुटका करून घेतली. पण तिथून पुढे बगारबझारमध्ये संतप्त जमावाने त्यांना पुन्हा गाठलं आणि त्यांची हत्या केली.
शांतो खान यानं नुकतंच कमांडो चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्याशिवाय, त्यानं आणखी १० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात काही टॉलिवुडमधील चित्रपटांचाही समावेश आहे.