भारत व बांगलादेश यांच्यात प्रलंबित असलेला तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा मुद्दा दोन्ही देशांचे हित सांभाळून सोडवण्यात ‘सकारात्मक भूमिका’ बजावण्याचे आश्वासन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना शनिवारी दिले.
सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जीनी शनिवारी शेख हसिना यांची भेट घेतली. या भेटीत ममतांनी स्वत:हून तिस्ता नदीचा मुद्दा उपस्थित केला, तसेच २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारतीय संसदेच्या अधिवेशनात भूमी सीमा करार कायम केला जाण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचे हसिना यांना सांगितले, अशी माहिती बांगलादेशी पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार इक्बाल शोभन चौधरी यांनी पत्रकारांना दिली.
बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान व भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ साली स्वाक्षरी केलेल्या भूमी सीमा कराराच्या धर्तीवर एलबीए कायम करण्याकरता भारतीय घटनेत दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेत आपली भूमिका आपण आधीच बजावली आहे, असे ममता यांनी शेख हसिना यांना सांगितले. लोकसभेच्या येत्या अधिवेशनात हा करार कायम केला जाण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.

Story img Loader