श्रीनगर :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
विजयकुमार असे या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. ते कुलगाममधील इल्लाकी देहाती बँकचे आरेह मोहनपुरा शाखेचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. विजयकुमार हे मूळचे राजस्थानचे असून, एका आठवडय़ापूर्वीच ते येथे सेवेत रुजू झाले होते. दहशतवाद्यांनी बँकेच्या शाखेत घुसून विजयकुमार यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांनी आठ नागरिकांची हत्या केली असून, त्यापैकी तीन जण बिगरमुस्लीम सरकारी कर्मचारी होते. दोन दिवसांपूर्वीच कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी रजनी बाला या शिक्षिकेची हत्या केली होती. त्याआधी १२ मे रोजी बडगाम जिल्ह्यात छदुरा तहसील कार्यालयात राहुल भट या लिपिकाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
भाजप, काँग्रेसबरोबरच सर्वच राजकीय पक्षांनी या हत्यासत्राचा तीव्र निषेध केला आहे. काश्मीरमधील सुरक्षेची स्थिती गंभीर असल्याचे नमूद करत काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले. काश्मीरमधील नागरिकांना सुरक्षा पुरविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला. भाजपचे काश्मीर धोरण अपयशी ठरल्याची टीका भाकपने केली. दुसरीकडे, काश्मीरमध्ये सुरू असलेले हत्याकांड हे तेथील शांतता बिघडविण्याचे पाकिस्तानचे कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भाजप करत असून, त्यात बाधा आणण्यात येत असल्याचे भाजप नेते रिवदर रैना म्हणाले.
काश्मीरमधील हत्यासत्राच्या निषेधार्थ अवामी आवाज पार्टीने गुरुवारी श्रीनगरमध्ये निदर्शने केली. काश्मिरी नागरिकांना हिंसाचाराला सामोरे का जावे लागत आहे, असा सवाल करत न्याय देण्याची मागणी करणाऱ्या घोषणा निदर्शकांनी दिल्या.
‘काश्मिरी हिंदूंना सुरक्षित स्थळी हलवा’
काश्मिरी हिंदूंना सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी ‘पनून काश्मीर’ आणि ‘एकजूट जम्मू’ या संघटनांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांत काश्मीरमधील हिंदूू कर्मचाऱ्यांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे काश्मीरमधील शासकीय सेवेतील हिंदू कर्मचाऱ्यांना तातडीने जम्मूमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्याची गरज आहे, असे ‘एकजूट काश्मीर’चे अध्यक्ष अंकुर शर्मा आणि ‘पनून काश्मीर’चे अध्यक्ष अजय श्रुंगू यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. या संघटनांनी सुरक्षेच्या मुद्दय़ावर केंद्रातील भाजप सरकारलाही लक्ष्य केले आहे.
शहा-डोभाल यांच्यात चर्चा
काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी ‘रॉ’चे प्रमुख सामंत गोयल उपस्थित होते. या वेळी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या मुद्दय़ावर चर्चा झाली असून, अमित शहा हे आज, शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत अजित डोभाल यांच्यासह जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहणार आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हल्लेखोर.