माहिती अधिकारात उघड

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि राहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेला गंडवल्याचे प्रकरण उघडकीस येण्याच्या आधी देशातील विविध बँकांमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल ६२ हजार कोटींहून अधिक रुपयांचे घोटाळे झाल्याचे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने माहिती अधिकारात दिलेल्या तपशीलातून उघडकीस आले आहे.

घोटाळे झालेल्या ७४ राष्ट्रीय आणि खासगी बँकाची यादी रिझव्‍‌र्ह बँकेने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना उपलब्ध केली. या बँकांमध्ये २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षांतील ही प्रकरणे आहेत.  यात सर्वाधिक घोटाळे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)मध्ये झाले आहेत. या बँकेत गेल्या तीन वर्षांत ५ हजार ९३६ कोटींचे घोटाळे झाले आहेत. त्यानंतर पीएनबी बँकेचा क्रमांक लागतो. येथे ५ हजार ४७१ कोटींचे घोटाळे झाले. या काळात घोटाळ्यांची संख्या आणि अपहाराच्या रकमेतही मोठी वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये ४ हजार ६३९ घोटाळे झाले. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ५ हजार ७८ घोटाळे झाले. म्हणजे घोटाळ्यांची संख्या ४३९ एवढी वाढली.

देशातील बँकामध्ये २०१४-१५ मध्ये १९ हजार ४५५ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. तर २०१६-१७ मध्ये ही संख्या ५०७८ वर गेली आणि यात २३ हजार ९३४ कोटींचा फटका बसला. या यादीत एसबीआय, पीएनबीनंतर  बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो. त्यानंतर  बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा  क्रमांक आहे.  आयडीबीआय आणि अलाहाबाद बँकेचा देखील या यादीत समावेश आहे. अशा नऊ राष्ट्रीयकृत बँका आणि एक्सीस बँक या खासगी बँकेत घोटाळे झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

देशातील सर्वांत मोठी राष्ट्रीयकृत बँक एसबीआयमध्ये सर्वाधिक रकमेचा घोटाळे झाले आहे. गेल्या तीन वर्षांत बँक ऑफ बडोदामध्ये ७२० , एक्सीस बँकेत ६३६ आणि सिंडीकेट बँकेत ५५२ घोटाळे झाल्याचे समोर आले आहेत. हा तपशील बँकेचे  माहिती अधिकारी एस.के. पाणिग्रही यांनी दिलेला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

२०१४-१५ दरम्यान ६५१ घोटाळे झाले. त्यातील रक्कम १६ हजार लाख रुपये एवढी आहे. २०१५-१६ या काळात ५४४ घोटाळे झाले. यावर्षी तब्बल २४ हजार लाख रुपयांची फसवणूक झाली.

पंजाब नॅशनल बँक

२०१४-१५ मध्ये १८० घोटाळे झाले. ही रक्कम २३ हजार लाख रुपये एवढी आहे. २०१५-१६ या काळात १३१ घोटाळे झाले. यात ३ हजार लाख, २०१६-१७ मध्ये १६० घोटाळे झाले. यात २८ हजार लाखांनी देशाला गंडवण्यात आले.