शिल्लक असलेल्या ५० हजार कोटी रुपयांच्या करवसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्रीय थेट कर मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) धडक मोहीम राबविली असून त्याचाच एक भाग म्हणून सर्व कार्यालयांना रात्रंदिवस कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या रजाही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करवसुलीसाठी सर्व प्राप्तिकर कार्यालये येत्या २९, ३० व ३१ मार्च रोजी खुली ठेवण्यात येणार आहेत.
यंदाच्या आर्थिक वर्षांत ६.३६ लाख कोटींच्या एकूण करवसुलीचे उद्दिष्ट असून ते गाठण्यासाठी मंडळ आता सरसावले आहे. अधिकृतरीत्या मिळालेल्या माहितीनुसार सध्याचे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी करवसुलीचे आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी अद्याप ५० हजार २०४ कोटींची करवसुली बाकी आहे आणि त्याच्याच वसुलीसाठी मंडळाने आपल्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठी मंडळाने देशभरातील प्राप्तिकर खात्याचे सर्व मुख्य आयुक्त तसेच महासंचालकांची एक बैठकही घेऊन करवसुलीसाठी कार्यरत असलेले सर्व अधिकारी, मुख्य आयुक्त यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत आपापली मुख्यालये सोडून जाऊ नयेत, असे आदेश दिले.
दरम्यान, देशभरातील प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी शोधमोहिमा हाती घेऊन करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत.

Story img Loader