पीटीआय, वॉशिंग्टन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी शुक्रवारी, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. कमला हॅरिस या उत्कृष्ट अध्यक्ष होतील असा विश्वास ओबामा यांनी व्यक्त केला आहे.नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात विजयी होण्यासाठी त्यांना शक्य ती मदत करणार असल्याचेही ओबामा यांनी समाजमाध्यमावरून जाहीर केले.

ट्रम्प यांच्याबरोबर वादविवादाच्या पहिल्या फेरीत निस्तेज कामगिरी केल्यानंतर विद्यामान अध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूक लढवू नये यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात होते. ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना मिळणारी सहानुभूती पाहून या प्रयत्नांनी वेग घेतला होता.अखेर पक्षाच्या प्रतिनिधींची मागणी मान्य करत बायडेन यांनी माघार घेतली. त्यानंतर काहीच तासांनी ५९ वर्षीय कमला हॅरिस यांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यांना पक्ष प्रतिनिधींचा आवश्यक तो पाठिंबाही लवकरच मिळाला. मात्र, त्याचवेळी मिशेल ओबामा यांनीच उमेदवारीसाठी प्रयत्न करावे अशी चर्चा सुरू झाली होती. त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मिशेल आणि बराक ओबामा या दोघांनीही पाठिंबा दिल्यामुळे हॅरिस यांची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barack obama and michelle obama announced their support for democratic party candidate kamala harris for the presidential election amy