भारतीय वंशाच्या सहा वैज्ञानिकांसह एकूण १०६ वैज्ञानिकांची अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी युवा वैज्ञानिक व अभियंत्यांसाठी असलेल्या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली आहे. वॉशिंग्टन येथे पुरस्कार वितरण समारंभ लवकरच होणार आहे. या तरूण संशोधकांनी केलेली कामगिरी ही गौरवास्पद आहे. हवामान बदल, आरोग्य व मानवी कल्याण या क्षेत्रात त्यांनी मोलाची भर टाकली आहे. तरूण संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. त्यात नवप्रवर्तनात्मक शोधांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.
या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये सहा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचा समावेश असून परडय़ू विद्यापीठाचे संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्यांचे संशोधन संगणक आज्ञावलीच्या भाषांशी निगडित आहे.
हार्वर्ड विद्यापीठात मूळपेशी क्षेत्रात संशोधनात काम करणारे किरण मसुनुरू यांचाही समावेश असून त्यांचे संशोधन हृदयाच्या जनुकीय व चयापचय क्रियांशी निगडित आहे.
मॉलीक्युलर फिजिऑलॉजी अँड बायोफिजिक्स व्हॅडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे सचिन पटेल यांचाही गौरव होत असून त्यांनी न्यूरॉनमधील कॅनाबिनॉइडचे मेंदूतील कार्य समजून घेण्यात मोठे काम केले आहे त्यामुळे मानसिक रोगांवर उपचार शक्य आहे. नासाच्या ग्लेन रीसर्च सेंटरचे विक्रम श्याम यांचे संशोधन इंजिन फ्लो फिजिक्स, बायोमिमेटिक याच्याशी संबंधित आहे. राहुल मंघाराम हे पेनसिल्वानिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक असून त्यांनी ऊर्जाक्षम इमारती, स्वयंचलित यंत्रे व औद्योगिक बिनतारी यंत्रणा यावर संशोधन केले.
वॉशिंग्टन विद्यापीठातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे प्राध्यापक श्वेताक पटेल यांना संगणक-मानव संबंध, संवेदक नियंत्रित प्रणाली यासाठी गौरवण्यात येत आहे.
* अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कारकीर्दीत १९९६ मध्ये हे पुरस्कार सुरू करण्यात आले.
* विज्ञान व तंत्रज्ञानातील अभिनव संशोधन करणाऱ्यांना यात उत्तेजन दिले जाते.