‘अंधारावर प्रकाशाला कायमच विजयश्री मिळो.. आणि या विजयाची आठवण प्रत्येक दिवाळी तुम्हा सर्वाना करून देत राहो!’ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जगभरातील हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
अमेरिकेत बऱ्याच मोठय़ा संख्येने भारतीय लोक राहतात. दिवाळी साजरी करण्याच्या निमित्ताने ते आपल्या घरीही सजावट करतात. येथे ते आपल्या परंपरा मोठय़ा श्रद्धेने पाळतात. मात्र यामुळे आमच्या देशात परंपरा आणि श्रद्धांमध्ये किती वैविध्य आहे, हे आम्हाला कळते, असे ओबामा यांनी नमूद केले.
‘विविधतेत एकता’ हे भारताचे वैशिष्टय़ मानले जाते. ‘मात्र, आमच्या देशातील हे वैविध्य मला प्रचंड सुखावणारे आहे. आणि म्हणूनच अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे नेते दिवाळी साजरी करण्यासाठी कॅपिटॉल हिल येथे एकत्र येणार आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘गेली पाच वर्षे मला आणि माझी पत्नी मिशेल हिला भारताच्या या प्राचीन सणाची सुट्टी अनुभवायची संधी येथे मिळाली. आमच्यासारखीच ही सुट्टी साजरी करणाऱ्या सर्वानाच मी दिवाळीच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छा देतो’, असे ओबामांनी सांगितले.
 फराळ, नृत्य आणि नवीन कपडे यांचा आनंद आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात अधिक खुलतो. आयुष्यातील अतिशय साध्या साध्या वाटणाऱ्या या क्षणांनीच आपले आयुष्य समृद्ध होत असते. श्रद्धा कोणत्याही धर्मावर असो, प्रार्थनेतून सेवा करण्याची प्रेरणा मिळते. आणि हेच सणांचं आपल्याला मोठ्ठं देणं असतं, असेही ओबामा यांनी म्हटले आहे.

Story img Loader