इजिप्तमधील नाटय़मय राजकीय घडामोडींनंतर अध्यक्ष मोर्सी यांना पायउतार व्हावे लागल्याने, आता या देशात लोकशाहीची प्रतिष्ठापना शक्य तितक्या तातडीने करावी, असे आवाहन या देशाच्या लष्कराला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे. देशात अत्यंत पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने कारभार चालावा यासाठी इजिप्तमध्ये लोकशाहीची स्थापना गरजेची असून, बंडखोरांचे नेतृत्व करणाऱ्या लष्कराने यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलावीत, अशी सूचना अमेरिकेने केली आहे.
मोर्सी यांना पदच्युत करून तेथील राज्यघटना तहकूब करण्याच्या निर्णयाने आपल्याला धक्का बसला आहे, मात्र आता जबाबदारी लष्कराची आहे, असे ओबामा यांनी सांगितले. आता मात्र या देशाच्या लष्कराने अत्यंत जलदगतीने येथे संपूर्ण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नागरी सरकारची स्थापना करावी, असे आवाहन ओबामांनी केले. सरकार स्थापनेची ही प्रक्रिया पुरेशी पारदर्शक आणि सर्वसमावेशक असेल अशी अपेक्षाही ओबामांनी व्यक्त केली. सत्तेवर नवे लोकनियुक्त सरकार येईपर्यंत लोकांच्या हक्कांचे रक्षण करणे, लोकशाहीतील सत्ता समतोलाचे सूत्र जोपासणे आणि लोकांच्या अपेक्षांचा सन्मान राखणे या बाबी लष्करी सत्ता जोपासेल, अशी अपेक्षा ओबामांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा