अत्यंत धोकादायक दहशतवादी गट म्हणून ओळखण्यात येणाऱ्या आयसिसने आता सीरिया आणि इराकमध्ये बचावात्मक पवित्रा घेतला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. आयसिसचे जाळे उद्ध्वस्त करण्यास अमेरिका आणि त्याचे सहकारी देश कटिबद्ध असल्याचेही ओबामा यांनी स्पष्ट केले.
सध्या सीरिया आणि इराकमध्ये आयसिसने बचावात्मक पवित्रा घेतला आहे, आपला ६६ देशांचा गट आता आक्रमक झाला आहे, मोहिमेने आता वेग घेतला असून तो कायम ठेवायचा आहे, असेही ओबामा म्हणाले. सीआयएच्या मुख्यालयात राष्ट्रीय सुरक्षा पथकातील उच्चपदस्थांशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
ब्रसेल्स, इस्तंबूल, इराकवर अलीकडेच आयसिसने हल्ले केले त्यामध्ये फुटबॉलचा सामना पाहात असलेली मुले ठार झाली त्यावरून आयसिस अद्यापही भयंकर हिंसाचार घडवून आणू शकते असे स्पष्ट झाले. या हल्ल्यांमुळे आपले सामूहिक प्रयत्न खिळखिळे झाले असे त्यांना वाटते, मात्र यामुळे ६६ देशांचे ऐक्य अधिक मजबूत झाले असून आयसिसचा या पृथ्वीवरूनच नि:पात करण्याचा निर्धार बळावला आहे, असेही ओबामा म्हणाले.
आयसिसवर आतापर्यंत ११ हजार ५०० हवाई हल्ले करण्यात आले, सीरिया आणि इराकमधील काही भागांमध्ये अद्यापही त्यांचे प्राबल्य आहे, असे असले तरी गेल्या वर्षीपासून आयसिसला एकही मोठा हल्ला करता आलेला नाही, अमेरिका आणि त्यांचे सहकारी देश आयसिसच्या म्होरक्यांविरुद्ध कारवाई करीत आहे, सीरिया आणि इराकमधील आयसिसचे वर्चस्व कमी होत चालले आहे, असे ओबामा म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा