Barack Obama on Israel Hamas War : इस्रायल हमास युद्धाचे जगभर पडसाद उमटत आहेत. संपूर्ण जगाचं या युद्धाकडे लक्ष लागलं आहे. जगभरातील अनेक देशांचे प्रमुख नेते या युद्धावर बारीक लक्ष ठेवून आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या युद्धाबाबत आपापली मतं मांडली आहेत. अशातच अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या युद्धावर भाष्य केलं आहे. ओबामा यांनी इस्रायलला इशारा दिला आहे. ओबामा म्हणाले, गाझा पट्टीत इस्रायलने सुरू केलेल्या कारवाया, जसे की, अन्न-पाण्याचा पुरवठा रोखणे, वीजपुरवठा खंडित करणे, या सगळ्यांचे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. कारण या गोष्टींमुळे पुढच्या अनेक पिढ्यांमधील पॅलेस्टिनी नागरिकांची इस्रायलप्रतीची वृत्ती अधिक कठोर होईल.
बराक ओबामा म्हणाले, इस्रायलने अशा प्रकारे अन्न-पाण्याचा पुरवठा रोखला तर त्याचा इस्रायललाही फटका बसेल. अशा वागण्याने इस्रायलचा आंतरराष्ट्रीय पाठिंबा कमी होईल. या युद्धात तुम्ही ज्या-ज्या मानवतावादी गोष्टींकडे दुर्लक्ष कराल त्याचे तुम्हाला परिणाम भोगावे लागू शकतात. गाझामधील अन्न, पाणी आणि वीज खंडित करण्याच्या इस्रायली सरकारच्या या निर्णयामुळे केवळ मानवतावादी संकट उद्भवलेलं नाही, तर त्यांच्या अशा वागण्यामुळे सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचा इस्रायलकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूप कठोर होईल. जगभरातून इस्रायलला आत्ता जे समर्थन मिळतंय ते समर्थन त्यांना मिळणार नाही. या भागात शांतता निर्माण करण्यासाठी आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे प्रयत्न झाले त्यावर पाणी फेरलं जाईल.
हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर शेपणास्रं डागून युद्धाला सुरुवात केली होती. हमासच्या क्षेपणास्रं हल्ल्यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीत आणि पॅलेस्टाईनवर क्षेपणास्रं डागली. या युद्धात आतापर्यंत पाच हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तसेच हमासने २२० नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. दरम्यान, ओबामा यांनी हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, इस्रायलला त्यांचं स्वसंरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी अमेरिकेचा अध्यक्ष असतानाही इस्रायलच्या स्वंसरक्षणार्थ कारवायांचं समर्थन केलं होतं.
हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धात पंतप्रधान मोदींची मध्यस्थी? नेतान्याहू, पॅलेस्टाईनच्या नेत्यांपाठोपाठ जॉर्डनच्या राजाशी संवाद; म्हणाले…
ओबामांकडून इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये शांतता करार करण्याचा प्रयत्न
ओबामा यांनी इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे होणाऱ्या जीवितहानीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच इस्रायलला संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या सरकारने इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शांतता करार घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ओबामा प्रशासन यात अपयशी ठरलं. त्यांच्यानंतरच्या अमेरिकेच्या कुठल्याही अध्यक्षाने तसे प्रयत्न केले नाहीत.