* शिकागोपासून न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकापर्यंत ओबामा समर्थकांचा जल्लोष, अभिनंदनाचा वर्षांव
पीटीआय , वॉशिंग्टन
कोटय़वधी रोजगारांची निर्मिती, अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल, पाकिस्तानशी घट्ट मैत्री, इराणशी युद्ध.. अशी आश्वासने देणारे रिपब्लिकन उमेदवार मिट रोम्नी यांना न भुलता अमेरिकी जनतेने बुधवारी (अमेरिकन प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री) पुन्हा एकदा शांत-संयत आणि आश्वासक व्यक्तिमत्त्वाचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आणि अमेरिकेसह जगभर ‘जीत गये रे ओबामा’चा जल्लोष झाला!
जागतिक बाजारपेठेत घसरलेले पतमानांकन असो वा गटांगळ्या खात असलेली अमेरिकन अर्थव्यवस्था असो या दोन्हींचे भांडवल करत मिट रोम्नी यांनी अध्यक्ष बराक ओबामांविरोधात जोरदार प्रचार आघाडी उघडली होती.
ओबामांना अध्यक्षपदावरून पायउतार करण्यासाठी रोम्नी यांनी ‘व्हाइट अमेरिकन्स’च्या भावनांनाही हात घातला होता. प्रचाराच्या भरात त्यांनी बरीच अद्वातद्वा आश्वासनेही दिली. मात्र, या सर्व गदारोळात अमेरिकन जनतेला भावला तो बराक ओबामांचा शांत आणि संयतपणा. त्यामुळेच त्यांनी ओबामांनाच पुन्हा अध्यक्षपदासाठी पसंती दर्शवली.
मिट रोम्नी यांच्याशी झालेल्या तीनही वादविवादांत ओबामा यांनी एकदाही तोल ढळू न देता देशाची सद्यपरिस्थितीच विशद केली. प्रचारातही त्यांनी कुठेही कोणतेही भंपक आश्वासन न देता ‘चार र्वष एवढे काम केले आहे, त्यांची पूर्तता करण्यासाठी आणखी चार र्वष द्या’ असे सरळसरळ आवाहन जनतेला केले. रोम्नी यांच्याविरोधात त्यांनी कोणतीही आगपाखड केली नाही की मतदारांना भूलथापा दिल्या नाहीत. याचाच परिपाक म्हणून कृष्णवर्णीय ओबामाच पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये स्थानापन्न झाले.    

ओबामांना शुभेच्छा
बराक ओबामांचे अभिनंदन. पुढील चार वर्षे ते देशाचा कारभार निश्चितपणे योग्य पद्धतीने हाकतील असा विश्वास आहे. पुढील वाटचालीसाठी ओबामांना ‘ऑल द बेस्ट’. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी आहे. मला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचे आभार.

सर्वोत्तम कामगिरी बाकी
या निवडणुकीत तुम्ही अमेरिकी लोकांनी एक जाणीव करून दिलीत, ती म्हणजे आपला रस्ता कठीण आहे, आपला प्रवास लांबचा आहे, आपण पुन्हा एकदा उभारी धरली आहे. अमेरिकेसाठी अजूनही जे चांगले काहीतरी करायचे आहे ते बाकी आहे.

Story img Loader