ब्रिटनच्या क्रीडा, प्रसारमाध्यमे आणि सांस्कृतिक मंत्रालयाने लंडन शहरामध्ये बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली आहे. बसवेश्वर यांनी ज्या तळमळीने आणि आत्मीयतेने लोकशाहीचा प्रसार आणि प्रचार केला ते निव्वळ स्तंभित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिटनच्या संसदेचे सभापती जॉन बरकौ यांनी या वेळी दिली.
बाराव्या शतकामध्ये, जेव्हा ब्रिटनमधील कोणालाही लोकशाही यंत्रणेबद्दल माहिती नव्हती, त्या वेळी बसवेश्वर यांनी भारतातील जातीव्यवस्थेला कडाडून विरोध केला होता. इतकेच नाही तर कालुचेरी संस्थानाचे पंतप्रधान म्हणून बसवेश्वरांनी लोकशाहीचा ठाम पुरस्कार केला होता. त्यामुळेच बसवेश्वर यांना लोकशाहीच्या आद्य संस्थापकांपैकी एक मानावे लागेल आणि म्हणूनच त्यांचा पुतळा उभारण्याच्या भूमिकेचे मी अभिनंदन करतो, असा अभिप्राय सभापती जॉन बरकौ यांनी दिला.
१२ व्या शतकातील कन्नड कवी, तत्त्वज्ञ आणि राष्ट्रपुरुष म्हणून बसवेश्वर सर्वपरिचित आहेत. दक्षिण भारतामध्ये ‘अनुभव मंतप’ या नावाची आद्य संसद त्यांच्या कल्पनेतून साकार झाली होती. या संसदेत स्त्रिया आणि पुरुष यांना समान प्रतिनिधित्व होते तसेच सर्वच सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून आलेल्यांनाही प्रतिनिधित्व होते. सन २००२ मध्ये भारतीय संसदेमध्ये बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘लंडन बॉरो ऑफ लॅम्बेथ’नी बसवेश्वरांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावास अनुमती दिली होती. मात्र इंग्लंडमधील कायद्यांनुसार, सांस्कृतिक मंत्रालयाची परवानगी मिळणे यासाठी आवश्यक होते. आता ही परवानगी मिळाल्यामुळे पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा