पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील लष्करी छावणीमध्ये बुधवारी (१२ एप्रिल) सकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. या गोळीबारात चार जवान शहीद झाले. अंतर्गत वादातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, हा हल्ला कोणी केला याबाबत कळले नव्हते. परंतु, पोलिसांनी आता या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पकडलेल्या आरोपीने आधी स्वतःची ओळख प्रत्यक्षदर्शी अशी केली होती. सखोल तपासणीनंतर त्यानेच गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले.
भटिंडा पोलीस अधीक्षक गुलनीत सिंग खुराना यांनी सांगितले की, “आरोपीला अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक कारणामुळे आरोपीने गोळीबार केला होता.” तर, लैंगिक शोषण केले जात असल्यामुळे आरोपीने त्या चौघांवर गोळीबार केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.
हेही वाचा >> भटिंडा छावणीमध्ये गोळीबार, ४ जवान शहीद; देशातील सर्वांत मोठ्या लष्करी छावणीचे महत्त्व काय? जाणून घ्या….
सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले तरीही…
घटना घडल्यानंतर आरोपीचा शोध घेण्याकरता पोलिसांनी तपासकार्य सुरू केले. आरोपी बाहेरून आतमध्ये कसा आला याकरता सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. परंतु, सीसीटीव्ही फुटेजनुसार बाहेरील कोणताही व्यक्ती आत आल्याचं स्पष्ट झालं नाही. त्यामुळे छावणीच्या आतमध्ये असलेल्यापैकीच कोणीतरी गोळीबार केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
हेही वाचा >> CoronaVirus Update : देशभरात करोनामुळे २४ जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांचाही आकडा वाढला; नवे बाधित किती?
दरम्यान, घटना घडल्यानंतर सायंकाळी छावणीच्या जंगलातून एका इंसास रायफलही जप्त करण्यात आले होते. तसंच, ज्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे त्याने आधी या घटनेतील प्रत्यक्षदर्शी असल्याचा बनाव केला. गोळीबार केल्यानंतर पांढरा कुर्ता आणि पायजमा घातेलेल दोन मास्कधारी माणसे जंगलाच्या दिशेने पळाली असा दावा करून त्याने पोलिसांची दिशाभूल केली. त्यामुळे पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने जंगलात तपासकार्य केले. परंतु, पोलिसांना कोणीही सापडले नाही. या प्रकरणी दिल्लीतील लष्करी मुख्यालयातील एक पथकही तपासणी करत आहे. अखेर, पोलिसांच्या चौकशीत प्रत्यक्षदर्शी असलेला देसाई मोहन याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.