देशातील बहुचर्चित बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणातील दोषी आरिज खानची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने बदलली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली की बाटला हाऊस येथे काही दहशतवादी लपून बसले आहेत. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बाटला हाऊसवर छापा टाकला. यावेळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा शहीद झाले तर पोलीस कर्मचारी बलवंतसिंह राजवीर जखमी झाले होते.
दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ३९ जणांचा मृत्यू झाला होता, तर १५९ जण जखमी झाले होते. हा साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणारे दहशतवादी बाटला हाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बाटला हाऊसवर छापा टाकला. पोलिसांनी इमारतीला वेढा घातला होता. तेव्हा तिथून पळून जाण्यासाठी दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांना जीव गमवावा लागला. पोलिसांनीही प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद हे दोन दहशतवादी ठार झाले. या धुमश्चक्रीत आरोपी आरिझ खान तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. परंतु, पोलिसांनी त्याला २०१८ मध्ये नेपाळमधून अटक केली. बाटला हाऊसमध्ये लपून बसलेला आणखी एक आरोपी शहजाद अहमद याला पोलिसांनी एन्काउंटरच्या दिवशीच अटक केली. त्याला २०१३ मध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावली.
हे ही वाचा >> Israel Hamas War : ‘हे’ सहा शक्तीशाली देश इस्रायलच्या बाजूने, तर सात राष्ट्रांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा?
अटकेनंतर आरिझ खानला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सत्र न्यायालयाने त्याला १५ मार्च २०२१ रोजी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच या शिक्षेच्या पुष्टीसाठी सत्र न्यायालयाने हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केलं. दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेऊन १८ ऑगस्ट २०२३ रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदूल आणि न्यायमूर्ती अमित शर्मा यांच्या खंडपीठाने आरिझ खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.