एपी, लंडन
‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’चे (बीबीसी) अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ते आपल्या सहभागाबद्दलचा समाधानकारक खुलासा देऊ न शकल्याचा अहवाल सादर झाला. त्यानंतर शार्प यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
या आधी बँक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ६७ वर्षीय शार्प यांनी सांगितले, की सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील नियुक्तींसंदर्भात प्रशासकीय संहितेचा त्यांनी भंग केल्याचा निष्कर्ष तपासाअंती काढण्यात आला आहे.बॅरिस्ट ॲडम हेप्पिन्स्टॉल यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात शार्प यांची नियुक्ती आणि जॉन्सन यांना आठ लाख पौंडांचे कर्ज मिळवून देण्यात त्यांच्या सहभागाची चौकशी करण्यात आली. शार्प यांनी एका निवेदनात नमूद केले, की, मी सरकारी नियुक्ती करताना प्रशासकीय संहितेचे उल्लंघन केल्याचे हेप्पिन्स्टॉल यांचे मत असले तरी, त्यांच्या म्हणण्यानुसार असे उल्लंघन झाले तरी नियुक्ती बेकायदेशीर ठरतेच असे नाही.
दुसऱ्या चुकीची कबुली!
या वृत्तानुसार शार्प यांनी सांगितले, की माजी पंतप्रधान जॉन्सन यांच्यासाठी कर्जसुविधा, तशी व्यवस्था किंवा वित्तपुरवठा करण्यात आपण कोणतीही भूमिका बजावली नाही. परंतु ‘बीबीसी’चे सर्वोच्च पद स्वीकारण्यापूर्वी चौकशी प्रक्रियेदरम्यान, ब्रिटनचे मंत्री सायमन केस आणि उद्योगपती सॅम ब्लिथ यांच्या भेटीमागे त्यांची भूमिका होती, हे सांगायला हवे होते. त्यांनी हे सांगितले नाही. ही चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले आणि त्याबद्दल खेद व्यक्त केला ‘बीबीसी’च्या अध्यक्षपदी दुसरी नियुक्ती होईपर्यंत ते हे पद जूनपर्यंत सांभाळतील, असेही शार्प यांनी सांगितले.