बीबीसीने प्रदर्शित केलेली “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या डॉक्युमेंट्रीमुळे भारतात बराच वाद पेटला. केंद्र सरकारने या डॉक्युमेंट्रीचे प्रदर्शन करण्यावर बंदी घातली. तर काही घटकांनी ही बंदी झुगारून डॉक्युमेंट्री पाहिली. आता बीबीसीची आणखी एक डॉक्युमेंट्री वादात सापडली आहे. ‘द शमीमा बेगम स्टोरी’ या नावाने प्रदर्शित करण्यात आलेल्या या डॉक्युमेंट्रीवर युकेमधून विरोध होत आहे. जिहादी ब्राईड या नावाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शमीमा बेगमवर ही डॉक्युमेंट्री चित्रित केलेली आहे. शमीमा १५ व्या वर्षी इंग्लंड मधील तिच्या घरातून पळून जात सीरियामधील इस्लामिक स्टेट या संघटनेत सहभागी झाली होती. सीरियात असताना तिला जिहादी ब्राईड या नावाने ओळखले जात होते. शमीमा आता २३ वर्षांची असून सीरिया आणि इस्लामिक स्टेटमधून बाहेर पडण्याचा तिचा संघर्ष सांगण्याचा तिचा प्रयत्न आहे. बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीमधून शमीमाबद्दल सहानुभूती दाखविण्याचा हा प्रकार असल्याची टीका युकेमधील नागरिक करत आहेत.
या डॉक्युमेंट्रीला विरोध का होतोय?
‘द शमीमा बेगम स्टोरी’ ही ९० मिनिटांची डॉक्युमेंट्री बीबीसीने प्रदर्शित केली आहे. द डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार “आय एम नॉट ए मॉनस्टर” या पॉडकास्टचे १० एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. इंग्लंड ते सीरिया पर्यंतचा शमीमाचा प्रवास कसा होता? यावर ही डॉक्युमेंट्री आधारीत असून त्यातून बाहेर पडण्याच्या तिच्या संघर्षाबाबत माहिती देण्यात आली आहे. सीरियामध्ये जाण्याच्या निर्णयाचे शमीमाला दुःख वाटत असून त्याचा तिला पश्चाताप होत आहे, अशी थीम या डॉक्युमेंट्रीमध्ये असल्यामुळे युकेमधील नागरिक नाराज आहेत.
हे वाचा >> विश्लेषण: आणीबाणीचा कायदा वापरून मोदी सरकारने BBC डॉक्युमेंट्री वर बंदी आणली, काय आहे हा कायदा?
बीबीसी ही माध्यम कंपनी मुळची युकेमधील आहे. आता स्वतःच्या देशातच बीबीसीला मोठा विरोध होत आहे. युकेमधील नागरिकांनी म्हटले की, आता आम्हाला बीसीसीचे पेड सबस्क्रिप्शन पुढे चालू ठेवण्यात रस वाटत नाही. जिहादी ब्राईडबाबत सहानुभूती आणि तिला एक छळवणूक झालेली मुलीच्या अवस्थेत दाखविले गेल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. एवढेच नाही तर लोकांचे म्हणणे आहे की, शमीमा बेगमला तिच्या कृत्यावर कोणताही पश्चाताप झालेला आम्हाला दिसला नाही. तिला आम्ही आमच्या टीव्हीवर का पाहायचं?
दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा मला पश्चाताप
लोकांनी विरोध केला असला तरी शमीमा बेगम मात्र आपल्याला पश्चाताप झाल्याचे सांगत आहे. मी दहशतवादाच्या विरोधात ब्रिटनची मदत करु इच्छिते. माझे उदाहरण हे समाजासाठी उपयोगी ठरू शकते, अशी प्रतिक्रिया शमीमाने बीबीसीशी बोलताना दिली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेट संघटेत सक्रीय झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर शमीमाचे नागरिकत्व ब्रिटनने काढून घेतले होते. २०१५ साली शमीमा आणि तिच्या दोन मैत्रिणींनी लंडनमधील आपली शाळा सोडून थेट सीरियात जाऊन इस्लामिक स्टेट संघटनेत सामील झाल्या होत्या. शमीमाचे कुटुंब बांगलादेशी असून ते ब्रिटनचे नागरिक आहेत.