नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त ‘बीबीसी’ वृत्तपट प्रदर्शित करण्याची घोषणा केल्यानंतर चार विद्यार्थ्यांना अटक केल्याचा निषेध करण्यासाठी जमलेल्या ७० हून अधिक विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. डाव्या विचारसरणीच्या ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) या संघटनेने हा आरोप केला. याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
विद्यार्थी विद्यापीठ परिसराबाहेर जमले असताना, मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’चे (आरएएफ) जवानही विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आले आहेत. ‘एसएफआय’च्या दिल्ली राज्य समितीचे सचिव प्रीतीश मेनन यांनी दावा केला की, पोलिसांनी तेथे जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी, ‘एसएफआय’च्या ‘जामिया’ शाखेने फलकाद्वारे प्रवेशद्वार क्रमांक आठवर संध्याकाळी सहाला हा वृत्तपट दाखवण्यात येणार, असे जाहीर केले होते.